Ratris Khel Chale Fame Actress Shakuntala Nare : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा पहिला भाग २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेला आता जवळपास १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही ‘रात्रीस खेळ चाले’ची लोकप्रियता घराघरांत कायम आहे. या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतो अण्णा नाईकांचा वाडा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब. यामध्ये अण्णा नाईकांच्या पत्नीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री शकुंतला नरेंनी साकारली आहे.
शकुंतला नरेंच्या भूमिकेचं नाव होतं इंदुमती नाईक त्यांना या मालिकेत प्रेमाने सगळे ‘माई’ म्हणायचे. आता ही माई सध्या काय करतेय जाणून घेऊयात…
‘रात्रीस खेळ चाले’ फेम शकुंतला नरे सध्या स्टार प्रवाहच्या ‘पाठराखीण’ मालिकेत आई आजीच्या भूमिकेत झळकत आहेत. ही मालिका दररोज रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. यासह नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शकुंतला नरेंनी त्यांच्या पहिल्या मानधनाबद्दल सुद्धा खुलासा केला आहे.
या क्षेत्रात तुमचा फर्स्ट पे चेक किती रुपयांचा होता? यावर शंकुतला नरे म्हणाल्या, “मला वन रुम किचनसाठी ( नाटक ) १५० रुपये मानधन मिळायचं. त्यासाठीही ते चार वेळा माझ्या घरी आले होते की, जरा मानधन कमी करा. तेव्हा मनात विचार आला…अरे मी बँकेत जास्त कमवत होते. पण, तेव्हा १५० रुपये सुद्धा खूप होते. याशिवाय मी तेव्हा या क्षेत्रात नवीन सुद्धा होते. हळुहळू काम करता-करता मग अनुभव आला आणि मग मी मला जे अपेक्षित मानधन आहे त्याबद्दल सांगू लागले.”
“विशेषत: तेव्हाचे निर्माते प्रामाणिकपणे वेळच्या वेळी मानधन द्यायचे. प्रयोग झाल्यावर लगेच मानधनाचं पाकिट मिळायचं” असं शकुंतला नरेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत माधव अभ्यंकर ( अण्णा ), मंगेश साळवी, सुहास शिरसाट, साईंकित कामत, नुपूर चितळे, अश्विनी मुकादम, ऋतुजा धर्माधिकारी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या मालिकेचे एकूण तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
