मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. तर, अनेकांनी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सुद्धा तिच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अपूर्वा लग्नबंधनात अडकली आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला तनुज गोवळकरशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. लग्नसोहळ्यात अभिनेत्रीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. हिरव्या रंगाची नऊवारी साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात सुंदर मंगळसूत्र या लूकमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसत होती.

अपूर्वा लग्नाचे फोटो शेअर करत लिहिते, “१४ फेब्रुवारी २०२६ अशी एक तारीख जी कायमस्वरुपी आमची झाली. या खास दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातील जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एक नवीन अध्याय सुरू केला. मला तुम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की, आता मी ‘मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर’ आहे. आयुष्याने माझी अनेकदा परीक्षा घेतली, यादरम्यान मी अनेक चढउतार अनुभवले आणि तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही. आयुष्यात एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही आणि अखेर देवाने माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या.”

“ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे…समजूतदारपणे आणि अतिशय आदरपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायम सोबत राहूद्यात…माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आज मी प्रचंड आनंदी अन् कृतज्ञ आहे. With Love, मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर.” असं अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्रीचं हे दुसरं लग्न आहे. अपूर्वाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतीच अपूर्वा ‘शुभविवाह’ मालिकेत झळकली होती. आता ती लग्नानंतर कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.