‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ हे पात्रं घराघरांत लोकप्रिय झालं होतं. सुरुवातीला अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ही भूमिका गाजवली होती. मात्र, त्यानंतर मालिकेच्या टीमशी मतभेद झाल्यामुळे तिने ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर रिप्लेसमेंट म्हणून शेवंताच्या भूमिकेसाठी कृतिका तुळसकरची वर्णी लागली. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अपूर्वाने शेवंताच्या भूमिकेविषयी आणि तिने मालिका सोडल्यावर झालेल्या रिप्लेसमेंटबाबत भाष्य केलं.
अपूर्वा म्हणाली, “मला मालिका सोडल्यावर भयंकर दु:ख झालं आणि जी कोणती अभिनेत्री ही भूमिका साकारणार होती तिच्याकडून मला एक फोन अपेक्षित होता…नेमकं काय झालंय हे तिने जाणून घेतलं नाही. असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं पण, मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कारण, प्रत्येकजण एवढं समजूतदार नसतं आणि प्रत्येकजण इतकं प्रोफेशनल नसतं हे मला समजलं.”
अपूर्वाच्या या वक्तव्यानंतर आता शेवंताची रिप्लेसमेंट साकारणाऱ्या कृतिकाने तुळसकरने व्हिडीओ शेअर करत रोष व्यक्त केला आहे तसेच आपली बाजूही स्पष्ट केली आहे.
कृतिका म्हणाली, “रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची ती अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे. नमस्कार! मी कृतिका तुळसकर…आताच थोड्यावेळापूर्वी मी एक व्हिडीओ पाहिला. त्या व्हिडीओमध्ये माझ्याआधी जिने शेवंताची भूमिका साकारली होती…तिचं असं म्हणणं आहे की, मी अनप्रोफेशनल अभिनेत्री आहे. तिला मी हे सांगू इच्छिते की, अनप्रोफेशनल याला म्हणतात…सेटवर वेळेत न येणं, दिग्दर्शकाला वाट पाहायला लावणं, इतर कलाकारांशी नीट न वागणं, निर्मात्याशी नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या मालिकेचा टीआरपी वाढतोय असा माज सगळ्या कलाकारांना दाखवणं…याला अनप्रोफेशनल म्हणतात.”
कृतिका पुढे म्हणाली, “एखादा निर्माता जेव्हा मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करतो…तेव्हा त्या सिरियलचा, कलाकारांचा, तंत्रज्ञांचा विचार न करता, आपण सोडून गेलो तर त्या मालिकेचं काय होईल…सगळ्यांच्या पोटापाण्याचं काय होईल याचा विचार न करता मालिका सोडून जाणं याला अनप्रोफेशनल म्हणतात. याशिवाय प्रोफेशनल याला म्हणतात…एका रात्रीत मालिकेसाठी उभं राहणं, कुठलीही पार्श्वभूमी नसताना मालिकेतल्या भूमिकेला न्याय देणं…याला प्रोफेशनल म्हणतात.”
“ती असं म्हणतेय की, मी तिला फोन करायला हवा होता…का? तिची माझी ओळख आहे? आपण मैत्रिणी आहोत का? नाही! एक अभिनेत्री म्हणून जर माझ्याकडे एखादी संधी चालून आली तर त्या संधीचं सोनं कसं करावं याचा विचार मी करणार की फोन करून काय गं बाई काय झालं? तू का सोडलीस मालिका? नेमकं काय झालं? याविषयी विचारणार..? असो, मी माझं काम शंभर टक्के केलेलं आहे. याशिवाय मी तिला विचारणं यासाठी मी बांधिल नाहीये. माझ्या प्रोफेशनल अन् अनप्रोफेशनलिझमबद्दल बोलण्याचा कुणाला काहीच अधिकार नाहीये. कारण, आम्ही एकत्र काम केलेलं नाही…त्यामुळे मी काय करते, कशी काम करते हे कुणाला माहितीच नाही. आपण पॉडकास्टमध्ये आजकाल सरळ उत्तर देतो…याचा विचारही करत नाही की, आपण समोरच्या व्यक्तीला कधी भेटलोही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की, यापुढे माझ्या बाबतीत बोलताना थोडासा विचार करून बोलावं तर याला आपण प्रोफेशनलिझम म्हणू…नाही का? ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं आहे, त्यांनाच माझ्या प्रोफेशनलिझमबद्दल बोलण्याचा खरा अधिकार आहे. बाकी प्रत्येक मत हे फक्त एक मत असतं. धन्यवाद!” असं कृतिकाने सांगितलं.
