Reem Shaikh on Interfaith Marriage: टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रीम शेख सध्या तिच्या एका खळबळजनक विधानामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर रीमच्या रिलेशनशिप आणि लग्नाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात, मात्र आता तिने स्वतःहून या विषयावर पडदा टाकला आहे. रीमने स्पष्ट केलं की, ती कधीही आंतरधर्मीय लग्न करणार नाही. रीम म्हणाली, “मी खूप धार्मिक आहे, दिवसातून पाच वेळा नमाज पठण करते आणि अल्लाहवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जो माझ्या धर्माचा नाही, त्याच्यासोबत आयुष्य व्यतीत करणं मला शक्य नाही.” या विधानासोबतच तिने आपल्या आई-वडिलांच्या विभक्त होण्यावरही भाष्य केलं आहे.
आंतरधर्मीय लग्न करणार नाही रीम शेख
“तुझ्या कुटुंबात आधी आंतरधर्मीय लग्न झाले आहे. जर तुला दुसऱ्या धर्माच्या मुलावर प्रेम झाले, तर तुझ्या आयुष्यात काही अडचणी येतील का?” असा प्रश्न रीम हिला शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये विचारण्यात आलं. उत्तर देताना रीम म्हणाली, “हे प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून आहे. मी खूप धार्मिक आहे. लोकांना कदाचित हे माहित नसेल, पण मी दिवसातून पाच वेळा नमाज पठण करते, त्यामुळे आंतरधर्मीय लग्न माझ्यासाठी अशक्य आहे.”
दुसऱ्या धर्मात लग्न का करणार नाही रीम?
रीम पुढे म्हणाली, “रमजानमध्ये मी रोजे ठेवते. गेल्या काही वर्षांपासून मी सर्व रोजे ठेवते. माझ्या आयुष्यात जेव्हाही काही चांगलं-वाईट घडतं, तेव्हा मी सर्वात आधी अल्लाहकडे दुआ मागते. त्यामुळे जी व्यक्ती माझ्या धर्माची नाही किंवा माझ्या धर्माचं पालन करत नाही, अशा व्यक्तीबरोबर मी आयुष्य घालवू शकणार नाही. हे मला शक्यच होणार नाही. या वक्तव्यावरून मला फार शिव्या पडतील तरीही.”
रीम शेखच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालाय
रीम शेखचे आई-वडील विभक्त झाले आहेत. तिने स्वत एका पॉडकास्टमध्ये याबद्दल खुलासा केला होता. साधारण पाच वर्षांपूर्वी तिच्या आई-बाबांचा घटस्फोट झाला. तिच्या आई-वडिलांमध्ये दररोज भांडणे व्हायची, ज्यामुळे तिचं बालपण खूप कठीण होतं, असं तिने सांगितलं. तिने लहानपणी घरात इतकी भांडणं पाहिली होती की तिच्या मनात राग व भीती दोन्ही होते. त्यावेळी कोणाशी बोलण्याची हिंमतही तिच्यात उरली नव्हती.
रीम शेखच्या आई-वडिलांचं आंतरधर्मीय लग्न होतं
रीमची आई शीतल हिंदू आहे आणि वडील मुस्लीम आहे. त्यामुळे तिच्या घरात पूजा आणि नमाज दोन्ही गोष्टी केल्या जात असत. घटस्फोटानंतर रीमच्या आईने दुसरं लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे. आपल्या सावत्र बहिणीबरोबर रीमचं नातं खूप चांगलं आहे.
रीम शेख हिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती गेल्या वर्षी ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमात दिसली होती. तसेच तिची एक वेब सीरिज आणि चार म्युझिक व्हिडिओ देखील प्रदर्शित झाले होते. सध्या तिने आपल्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
