Reena Madhukar Talks About Struggle & Career : कलाकार म्हटलं की संघर्ष हा आलाच. प्रत्येक कलाकाराला काम मिळवण्यासाठी आणि कामं मिळाल्यानंतर ती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. बऱ्याच कलाकारांना तर कित्येक दिवस काम मिळत नसल्यानं घरी बसावं लागतं, त्यामुळे काही कलाकार आर्थिक गणितं व्यवस्थित सुरू राहावीत म्हणून अभिनय क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातही काम करत असतात. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्री रीना मधुकर हिनं तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
रीना मधुकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं मराठीसह हिंदीतही काम केलं आहे. रीनानं मालिका, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमांतून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु, ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते ‘झी मराठी’वरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील तिच्या सानिका या पात्रामुळे. या मालिकेत ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत होती, तर रीना खलनायिकेच्या भूमिकेत होती. अशातच आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत रीनानं अभिनय क्षेत्रातील तिचा संघर्ष आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेचा प्रवास याबद्दल सांगितलं आहे.
रीनानं सांगितला संघर्षकाळ
मुलाखतीत इतकी कामं केल्यानंतर दोन वर्षे तू कॅमेऱ्यासमोर आलीच नाही याबद्दल काय वाटतं असं विचारल्यानंतर रीना म्हणाली, “मी दोन वर्षे कॅमेऱ्यापासून दूर आहे. मन उडू उडू झालं ही मालिका केल्यानंतर खूप इच्छा होती की अजून काही मालिका कराव्या किंवा अभिनयातच इतर काही काम करावं. पण, खरं सांगायचं तर मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत आणि झी मराठीच्या इतक्या मोठ्या मालिकेत काम केल्यानंतर मग त्याच त्याच भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. मला असं झालं की मला हे नाही करायचंय, मला काहीतरी वेगळं करायच आहे. मी माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळे केलं आहे, पण ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका झाल्यानंतर मला नकारात्मक भूमिकांसाठीच विचारणा होऊ लागली. त्यातही काहीतरी वेगळेपण असायला हवं, पण ते मला जाणवलं नाही. चांगल्या संधीची वाट बघत होते आणि तोपर्यंत माझ्याकडे ही प्रोडक्शनची संधी आली. मग म्हटलं करूयात, कारण कधी ना कधी मला ते करायचंच होतं.”
अभिनयातून निर्मिती क्षेत्रात आल्यानंतर रीना याबद्दल म्हणाली, “मी म्हटलं बघूयात हे आपल्याला आवडतंय का, पण नंतर मला ते करताना खूपच मज्जा यायला लागली. मग मी अभिनयातून जरा ब्रेक घेतला. अभिनय सोडलेला नाहीये. आता प्रोडक्शनमध्ये सगळं सुरळीत सुरू आहे, त्यामुळे पुन्हा अभिनयाकडे वळण्यासाठी माझी तयारी आहे.”
अभिनय क्षेत्रातील संघर्षाबद्दल रीना म्हणाली, “संघर्ष आहेच, मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. एक मालिका संपल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न प्रत्येक कलाकाराला पडतो; कलाकारांना खूप नकारांना सामोरे जावे लागते.”
