Aashka Goradia Baby Boy: तब्बल १४०० कोटींच्या संपत्तीची मालकीण असलेली लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व उद्योजिका आश्का गोराडिया दुसऱ्यांदा आई झाली आहे. ४० वर्षांच्या आश्काने एका आठवड्यापूर्वी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. बाळाचा फोटो शेअर करून आश्काने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

आश्काने डिसेंबर महिन्यात बेबी बंपचा फोटो पोस्ट करून ती व तिचा पती अमेरिकन बिझनेसमन ब्रेंट गोबल लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर आश्काचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालंय.

आश्का गोराडियाला पहिला मुलगा आहे. आता तिला दुसराही मुलगाच झाला आहे.
“आम्हाला तुम्हा सर्वांना सांगताना अत्यंत आनंद होतोय की १ मे २०२६ रोजी आमच्या आयुष्यात ‘रिचर्ड थिओडोर गोबल’ आला.
आणखी एका मुलाच्या जन्मामुळे, विल्यम अलेक्झांडरला आता भाऊ मिळाला आहे,” असं आश्का गोरडियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

पाहा आश्का गोराडियाची पोस्ट

आश्काने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर सर्वांनी तिचं अभिनंदन केलं आहे. द्रष्टी धामी, जुही परमार, आकृती कक्कर, मोनालिसा, शब्बीर अहलूवालिया, फलक नाज, निवेदिता बासू, श्वेता कावत्रा, सारा खान, रोशनी वालिया, मानसी पारेख, जया भट्टाचार्य, दिव्यांका त्रिपाठी, करिश्मा तन्ना, अदा खान, मौनी रॉय, जेनिफर विंगेट, सुरभी ज्योती, आरती सिंह, रश्मी देसाई, रिद्धिमा पंडित यांनी आश्काच्या पोस्टवर कमेंट्स करून तिचं अभिनंदन केलं.

दरम्यान, आश्का गोराडियाने २०१७ मध्ये ब्रेंट गोबलशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ वर्षांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केले. आता ते दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.

आश्का गोराडियाच्या मालिका

आश्काच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने २००२ मध्ये ‘अचानक 37 साल बाद’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण केले होते. नंतर तिने ‘भाभी’, ‘तुम बिन जाना कहाँ’ सारख्या शोमध्ये काम केले. २००३ मध्ये एकता कपूरच्या ‘कुसुम’ शोमुळे ती घराघरात पोहोचली. मग तिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘नागिन’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं. ती शेवटची २०१९ मध्ये ‘डायन’ मालिकेत झळकली होती.

अभिनय सोडून आश्काने उभारला कॉस्मेटिक ब्रँड

आश्का गोराडियाने २०२१ मध्ये अभिनय सोडला. अभिनय सोडण्यापूर्वी २०१८ मध्ये आश्काने ‘रेने कॉस्मेटिक्स’ (Renee Cosmetics) नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला होता. हा व्यवसाय तिने प्रियांक शाह व आशुतोष वलानीबरोबर मिळून सुरू केला. आश्काने रेने कॉस्मेटिक्सची सुरुवात फक्त ५० लाख रुपयांपासून केली होती. पहिल्या दोन वर्षातच रेने कॉस्मेटिक्सने तब्बल १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. २०२४ मध्ये रेने कॉस्मेटिक्सची व्हॅल्यू १२०० कोटींवरून १४०० कोटींवर पोहोचली आहे.