Actress Reshma Shinde Visit Shri Swami Samarth Temple : ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने रेश्मा कायमच सर्वांची मनं जिंकून घेते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शूटिंगमधून, व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत रेश्मा कायमच मराठी सण, परंपरा जपताना दिसते. यंदा गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर रेश्मा अक्कलकोटला गेली होती. स्वामींचं दर्शन घेतल्यावर तिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.

दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक अक्कलकोट येथे दाखल होतात. गुरुपौर्णिमेला मंदिर पहाटेच खुलं करण्यात येतं. काकड आरती होते, महाप्रसाद वाटप आणि पालखी मिरवणूक काढली जाते. या खासप्रसंगी मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सुद्धा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला पोहोचले होते. रेश्माने सुद्धा मंदिरात पोहोचताच मनोभावे प्रार्थना केली, स्वामींच्या पादुकांवर नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यावेळी रेश्माने मोरपिशी रंगाची सुंदर साडी, गळ्यात नाजूक ठुशी, केसात गजरा असा छान साधा अन् सुंदर मराठमोळा लूक केला होता. हे फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, “तुमच्या आशीर्वादाची जाणीव झाली की, तक्रारी आपोआप कमी होतात. सदैव ऋणी आहे.. अशीच कृपा असुदेत”

रेश्माने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “श्री स्वामी समर्थ…गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं दर्शन झालं…अजून काय हवं”, “स्वामींच्या कृपेने सुखात रहा…”, “रेश्मा आमची आवडती अभिनेत्री” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्यासह या मालिकेत सविता प्रभूणे, सुमीत पुसावळे, ऋतुजा कुलकर्णी, प्रतीक्षा मुणगेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रेश्मा शिंदेने वैयक्तिक आयुष्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असून तो साऊथ इंडियन आहे. पवन आयटी क्षेत्रात काम करतो. गुढीपाडवा असो किंवा वटपौर्णिमा लग्नानंतर रेश्मा आणि पवन प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरे करत असल्याचं पाहायला मिळतं.