Actress Reshma Shinde Ganpati Celebration : गणेशोत्सवानिमित्त सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. याची खास झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली आहे.

गणेशोत्सवानिमित्त रेश्माने पारंपरिक लूक केला होता. निळ्या रंगाची सुंदर साडी, तिचा पती साऊथ इंडियन असल्यामुळे गळ्यात पारंपरिक दाक्षिणात्य डिझाइनचं मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, केसात गजरा या लूकमध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसत होती. गणपतीनिमित्त रेश्माचं माहेरचं अन् सासरचं कुटुंब एकत्र आल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

रेश्मा, तिचा पती पवन आणि अभिनेत्रीच्या सासऱ्यांचा फॅमिली फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेत्रीने बाप्पासाठी घरगुती इकोफ्रेंडली सजावट केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. फुलांची आरास करून रेश्मा व पवन यांनी बाप्पाचा मखर सजवला आहे. याशिवाय अभिनेत्रीने वरण-भात, पापड, मसाले भात, चटणी, दोन प्रकारच्या भाज्या, पुऱ्या, उकडीचे मोदक, कोशिंबीर असा नैवेद्य बाप्पासाठी केला होता.

दरम्यान, रेश्मा व पवन यांचा विवाहसोहळा नोव्हेंबर २०२४ मध्ये थाटामाटात पार पडला होता. पवन साऊथ इंडियन असून, तो आयटी क्षेत्रात काम करतो. काही दिवसांपूर्वीच रेश्मा तिच्या या संपूर्ण कुटुंबासह कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेली होती. आता या कुटुंबाचे गणेशोत्सवातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

दरम्यान, रेश्माने या फोटोंना ‘आमच्या घरचा राजा’ असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. मराठी कलाकारांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.