Reshma Shinde Dance Video : अलीकडच्या काळात १२ तासांहून अधिक वेळ दैनंदिन मालिकांचं शूट सुरू असतं. त्यामुळे सेटवर असणाऱ्या सगळ्या कलाकारांचं आपआपसांत एक वेगळं बॉण्डिंग तयार होतं. हे सगळे कलाकार एकत्र पार्टी करतात, अनेकदा मोकळ्या वेळेत रील्स शूट करणं, डान्स व्हिडीओ बनवणं या गोष्टी प्रत्येक मालिकांच्या सेटवर सुरू असतात. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत एकमेकींच्या जावा असणाऱ्या रेश्मा शिंदे आणि ऋतुजा कुलकर्णी यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा शिंदेने ‘जानकी रणदिवे’ तर, ऋतुजा कुलकर्णीने ‘अवंतिका’ ही भूमिका साकारली आहे. या दोघी ऑनस्क्रीन एकमेकींच्या जाऊबाई आहेत. तर, ऑफस्क्रीन खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. रेश्मा आणि ऋतुजा नुकत्याच एका व्हायरल गाण्यावर थिरकल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर विविध गाणी ट्रेंड होत आहेत. यापैकी ‘’स्प्लेंडर फिरवतो माझा जानू…’ या गाण्यावर रेश्मा आणि ऋतुजा यांनी जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं निशा गायकवाडने गायलं असून आशिष शिंदे या गाण्याचा संगीतकार आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी या गाण्यावर डान्स करत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं आहे.

नेटकरी सुद्धा या दोघींचा डान्स अन् एनर्जी पाहून थक्क झाले आहेत. अवघ्या काही तासात रेश्माच्या या डान्स व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रेश्मा या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “बाकी सगळं ठीक आहे… पण Trending Audio वर रील झाली पाहिजे!”

“वाह वाह मस्त नाचलात”, “ओह हो मस्त डान्स”, “आधी तुम्ही जाऊन त्या शर्वरी ला धरा गं…”, “एनर्जी कमाल”, “हा व्हिडीओ तुफान व्हायरल होणार” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मा शिंदे अभिनेता सुमीत पुसावळेसह प्रमुख भूमिका साकारत आहे. या दोघांशिवाय मालिकेत प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, सविता प्रभुणे, भक्ती देसाई, उदय नेने आणि बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.