Reva Kaurse on Vishal Kotian: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातून राखी सावतं आणि तिच्यानंतर रेवा कौरसे नुकत्याच एलिमिनेट झाल्या. राखी सावंत वाईल्डकार्ड म्हणून आली होती. ती घरात आल्यानंतर अनेक गोष्टी बदललेल्या पाहायला मिळाले. सदस्यांबरोबरची मैत्री, भांडणे, वाद-विवाद अशा विविध गोष्टींतून राखीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राकेश बापटवर प्रेम झाल्याचे तिने वेळोवेळी सांगितले.

रेवा कौरसेचीदेखील वाईल्डकार्ड म्हणूनच एन्ट्री झाली होती. रेवानेदेखील तिच्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली. घरात प्रवेश केल्यानंतर वाईल्डकार्ड सदस्य कोणत्या ग्रुपबरोबर खेळणार, कोणत्या सदस्याबरोबर खेळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. काही काळानंतर रेवा काटा ग्रुपमध्ये सामील झाली. काटा ग्रुप आणि विशेषत: तन्वी कोलते यांच्याबरोबरची मैत्री प्रेक्षकांना आवडली.

आता घराबाहेर पडल्यानंतर रेवा कौरसेने विशाल कोटियनबद्दल वक्तव्य केले आहे. ती विशालबद्दल नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

“रुचिताला त्यामुळे त्रासही….”

विशाल कोटियनबद्दल रेवा म्हणाली, “तो स्वत:हून माझ्याशी बोलायला यायचा. सुरुवातीला गमतीजमतीमध्ये त्याने एक फ्लर्टिंग सुरू केले आणि मला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. कारण- मला माहित नव्हतं की त्याचं आणि रुचितामध्ये जे काही आहे, ते कितपत खरं आहे.तर ते मला पटत नव्हतं. रुचिताला त्यामुळे त्रासही झाला. टेन्शनमुळे ती खालीसुद्धा पडली होती. तिला आमच्यामुळे असुरक्षित वाटत आहे, आम्ही आल्यामुळे तिला जास्त ताण आला असावा. त्यामुळे मी विचार केला की, एखाद्या गेमसाठी मला असा कोणाला त्रास द्यायचा नाही. गेमबद्दलही बोलायचं झालं तर मला विशालबरोबर खेळायचंच नव्हतं. तर पहिल्या दिवसापासून मला माहित होतं की मला कोणाबरोबर खेळायचं आहे. सुरुवातीला असं काही शत्रुत्व नव्हतं. कारण- असा कुठलाच किस्सा झाला नव्हता. तो बोलायला यायचा.तो फ्लर्ट करायचा, पण ते मी टाळायचे. मला ते पटत नव्हतं.”

विशालबरोबरच रेवा घरातील इतर सदस्यांबद्दलही बोलली.सागर कारंडेबरोबर झालेल्या भांडणाचादेखील तिने उल्लेख केला. तसेच, काटा ग्रुप आणि ग्रुपमधील सदस्यांमधील बॉण्डिंगबद्दलही तिने वक्तव्य केले. राकेश बापट, राखी सावंत, तन्वी कोलते यांच्याबद्दलही तिने वक्तव्य केले.

दरम्यान, आता बिग बॉसच्या घरात अनुश्री माने, तन्वी कोलते, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, राकेश बापट हे स्पर्धक उरलेले आहेत. आता बिग बॉस ६ चा विजेता कोण ठरणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.