Reva Kaurse on friendship with Tanvi Kolte: रिअॅलिटी शोमधील काही स्पर्धक कमी काळात प्रेक्षकांची मने जिंकतात. शोमध्ये त्यांचे वेगळे स्थान निर्माण करतात. त्यांच्या खेळाचे प्रेक्षकच नाही तर शोमधील त्याचे सहस्पर्धकही कौतुक करतात. अशाच काही मोजक्या स्पर्धकांपैकी रेवा कौरसे एक आहे.

रेवा कौरसे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली. राखी सावंत शोमध्ये आल्यानंतर संस्कृती साळुंखे, संकेत पाठक व रेवा कौरसे बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झाले होते. त्यातील संस्कृती, संकेत हे लवकरच घराबाहेर पडले, मात्र रेवा खेळात टिकून राहिली. टॉप सहामध्ये ती होती. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे जात असताना रेवा सहाव्या स्थानावरून एलिमिनेट झाली.

“माझ्यासाठी धक्कादायक…”

रेवा जेव्हा बिग बॉसच्या घरात होती, त्यावेळी तिच्या व राकेश बापटच्या मैत्रीची चर्चा झाली. त्यांच्यातील मैत्री, जवळीक राखीला आवडली नाही, म्हणून राखीने भांडणे केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, रेवाने मुलाखतीत त्यांच्यात फक्त चांगली बॉण्डिंग असल्याचे वक्तव्य केले. याबरोबरच, तन्वी व रेवाच्या मैत्रीचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काहींनी ही मैत्री रेवाच्या बाजूने आहे, रेवा फक्त तन्वीचे ऐकून घेते, ती म्हणेल तसे वागते, अशाही कमेंट केल्या. आता स्वत: रेवानेच एका मुलाखतीत तन्वीबद्दल वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

रेवा कौरसेने नुकताच तारांगणशी संवाद साधला. तन्वी कोलतेबद्दल ती म्हणाली, “बाहेर आल्यानंतर तन्वीबद्दल वेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत. काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, ज्या माझ्यासाठी धक्कादायक आहेत. तन्वी व माझं नातं माझ्याकडून खरं होतं.”

“तन्वी आणि माझी मैत्री…”

तन्वीबरोबरच्या मैत्रीबद्दल ती म्हणाली, “तन्वी आणि माझी मैत्री आपोआप झाली. आमची मतं पटत गेली. खेळाबद्दल आमच्यात चर्चा व्हायची. गेमबद्दल माझी तळमळ तिला दिसायची. तिला मी एक चांगली स्पर्धक वाटायची, अशी आमच्या बॉण्डिंगला सुरुवात झाली. तिच्याकडूनही मला तो तितकाच दिसला. प्रत्येक गोष्टीत ती मला प्राधान्य द्यायची. टास्कमध्ये गिफ्ट द्यायचं असेल तर ती मला निवडायची. वाईल्ड कार्ड असूनही मी तिच्या मनात ते घर करून आली आहे, कारण तिच्याकडून आणि माझ्याकडून दोघींकडून ही मैत्री होती.”

ती पुढे असे म्हणाली, “ती घरातील माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. आम्ही सगळ्यात जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवलेला आहे. आम्ही अनेक गोष्टी एकमेकींशी बोलायचो. इतरांबरोबर ज्या गोष्टी ती बोलू शकत नसे, त्या गोष्टी ती माझ्याशी बोलायची. तिला काही त्रास होत असेल तर मी तिच्याबरोबर एक माणूस म्हणून असायचे.”

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात आता शेवटच्या आठवड्यात आणखी काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.