Swamini Actress Revati Lele Marriage and Love Story Updates : छोट्या पडद्यावरची ‘स्वामिनी’ म्हणून रेवती लेलेला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यात रेवती लग्नबंधनात अडकली. त्याआधी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देऊन रेवतीने तिच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अभिनेत्रीने कौशिक भिडेशी २० फेब्रुवारीला पुण्यात थाटामाटात लग्न केलं. अभिनेत्रीचा नवरा काय काम करतो…या दोघांची पहिली भेट केव्हा झाली होती. याबद्दल रेवतीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
रेवती लेले ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना म्हणाली, “माझा नवरा कौशिक भिडे ब्रँड डिझायनर आहे. त्याची स्वत:ची कंपनी आहे आणि तो डिझायनिंग सुद्धा शिकवतो. कौशिक आणि त्याच्या घरच्यांमुळे लग्न करून मी दुसऱ्या घरी आलीये हे मला जाणवत नाही. कारण, सगळे माझी खूप काळजी घेतात. फक्त एकच फरक आहे तो म्हणजे आता मी मुंबईत नसते, पुण्यात असते. १६ वर्षे मी मुंबईत राहिले असल्याने आता पुण्याचे रस्ते वगैरे मला पटकन समजत नाहीत. मग, मी कौशिकला फोन करून सगळं विचारते.”
कौशिक म्हणाला, “मी हिला २०१९ मध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तिची ‘स्वामिनी’ मालिका सुरू होती. माझ्या घरी सगळे टीव्ही बघत होते आणि रेवतीला पाहून मी लगेच माझ्या आईला म्हणालो, “मम्मा छान आहे गं ही”. पण, तो विषय तिथेच संपला. त्यानंतर पाच-सहा वर्षात मी हिला पाहिलं नाही. पुढे, जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा मला ‘स्वामिनी’ मालिकेची आठवण झाली.”
रेवती तिची लव्हस्टोरी सांगताना म्हणाली, “आमची ओळख झाली मग, आम्ही पुण्यात कॉफीसाठी एकत्र भेटलो. त्या पहिल्या एक-दोन भेटींमध्येच आम्ही एकमेकांबद्दल फार शुअर होतो. मग, हा मुंबईत आला…मग पुन्हा आम्ही डिनरला एकत्र गेलो. सुरुवातीला आम्हाला वाटलं लाँग डिस्टन्स नातं आहे कसं होईल वगैरे…पण, गोष्टी छान जुळून आल्या आणि मग पुढे सहा ते सात महिन्यात आमचं लग्न ठरलं.”
“मी घरी दोन महिन्यांत आमच्या नात्याबद्दल कल्पना दिली होती. पहिल्या भेटीपासून सगळ्या गोष्टी मी माझ्या आईला सांगितल्या होत्या. आठ महिने मी सोशल मीडियावर याच्याबद्दल काहीच शेअर केलं नव्हतं. आम्ही थेट लग्नाचे फोटो शेअर करणार होतो…पण, माझं असं झालं आता अंगठीचा फोटो शेअर करू शकतो. तरीही कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी याला ओळखलं. मग मी खूप कमेंट्स डिलीट सुद्धा केल्या.” असं रेवतीने यावेळी सांगितलं.
कौशिक प्रपोजलबद्दल म्हणाला, “मी तिला २६ डिसेंबरला प्रपोज केलं. त्यानंतर मी लोणावळ्यात एक छान रिसॉर्ट बूक केलं आणि तिथे मी तिला प्रपोज केलं.” यानंतर फेब्रुवारी महिन्यात रेवती-कौशिक लग्नबंधनात अडकले.
