Riteish Deshmukh Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला होता. मराठीतल्या दिग्गज कलाकारांपासून ते बॉलीवूडच्या सुपरस्टार्सपर्यंत अनेकांनी या शोमध्ये उपस्थिती लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान असे मोठमोठे स्टार्स आपले सिनेमे प्रमोट करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सहभागी झाले होते. पण, तुम्हाला माहितीये का, ‘चला हवा येऊ द्या’ या शोची सुरुवात रितेश देशमुखमुळे झाली होती. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कुशल बद्रिकेने सांगितलं आहे.

२०१४ मध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेला ‘लय भारी’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’ शोची सुरुवात झाली होती.

कुशल बद्रिके याबद्दल सांगतो, “मला रितेश देशमुख सरांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण आमचा शो ‘लय भारी’ चित्रपटाच्या निमित्ताने सुरू झाला होता. तोच या शोचा पहिला एपिसोड होता. ‘लय भारी’ सिनेमाला प्रमोट करण्यासाठी आपण एक छोटा इव्हेंट करूयात असं रितेश सरांचं ठरलं होतं. मी, निलेश आणि भाऊ असं आम्ही तिघंजण मिळून तो पहिला इव्हेंट करणार होतो. त्यानंतर मग म्युझिकसाठी तुषार देवल जॉइन झाला. तो इव्हेंट रितेश सरांना इतका आवडला की, ते म्हणाले..’तुम्ही हा शो सुरू का नाही करत?’ याचाच शो सुरू करा.”

“झी मराठीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि मग ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला. याला कारणीभूत रितेश सर आहेत. रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’ जन्माला आलं. त्यामुळे ते दिसल्यावर माझ्या मनात कायम ग्रेटफूल ही भावना येते.” असं कुशल बद्रिकेने ‘सर्व काही’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

कुशल पुढे म्हणाला, “एक काळ असा होता…जर तुम्हाला महाराष्ट्रात तुमचा सिनेमा पोहोचवायचा असेल तर ‘चला हवा येऊ द्या’शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बॉलीवूडचे अनेक आर्टिस्ट ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर येऊन गेले होते. या शोमुळे आम्हालाही त्यांच्याबरोबर संवाद साधता आला, त्या सगळ्या कलाकारांना भेटता आलं. मग हळुहळू मला समजलं ते लोक पण आपल्यासारखेच आहेत. पण, शाहरुख जेव्हा पहिल्यांदा सेटवर आला होता…त्याचा काय रुबाब होता, काय सांगू मी तुम्हाला मला खरंच खूप जास्त भारी वाटलं होतं…खूप मजा आली होती. मी त्याला सुरुवातीला खिडकीतून लपत-लपत पाहिलं होतं. खरंच एक वेगळीच फिलिंग होती.”