Riteish Deshmukh on Shiv Jayanti: आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याचे, त्यांचा विचारांचा वारसा जपला जातो. अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावतात. अनेक कलाकारही त्यानिमित्ताने व्यक्त होत असतात.

आता अभिनेता रितेश देशमुखने शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावली होती. त्याने यावेळी माध्यमांशी बोलताना त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रितेश देशमुख म्हणाला, “सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना, शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.”

पुढे तो म्हणाला, “आपल्यासारख्या भक्तांसाठी आज एक प्रेरणादायी, सौभाग्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यांची कीर्ती आणि त्यांचे शौर्य सर्वांनाच माहीत आहे. इतक्या वर्षानंतरही ते नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा देतात. आपल्याला जे काही काम करायचे आहे ते परिपूर्ण व्हावे, ही प्रेरणा त्यांच्याकडून मिळते. हीच प्रेरणा तुम्हाला मिळो, अशीच शुभेच्छा मी सर्वांना देतो.”

जेव्हा त्याला त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल विचारले, त्यावेळी तो म्हणाला भविष्यातील चित्रपटांबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही.

रितेश देशमुखचा तरुणांना खास संदेश

तरुणांमध्ये शिवजयंतीला खूप उत्साह असतो, याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे विचारले गेले. तेव्हा उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला, “मला वाटतं की, जे शिवभक्त आहेत, जे शिवप्रेमी आहेत, त्यांना महाराजांनी या देशासाठी काय केले, काय बलिदान दिले ती महाराजांच्या कार्याची माहिती आहे “

पुढे तो म्हणाला, “महाराजांची गाथा आजही मुलांना सांगितली पाहिजे, असं मला वाटतं. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, आपण एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

‘राजा शिवाजी’ चित्रपटात दिसणार ‘हे’ कलाकार

रितेश देशमुख राजा शिवाजी या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, अभिनेत्याचा चित्रपटातील लूकही पाहायला मिळाला होता.

रितेश देशमुखच्या या चित्रपटात अनेक बॉलीवूड कलाकारही झळकणार आहेत. अभिनेत्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख ‘राजा शिवाजी’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबरच भाग्यश्री, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, विद्या बालन, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

१ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमीळ, तेलुगू या सहा भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रितेश देशमुख सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.