उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळासह मराठी मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी अजित पवार यांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुख अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीला गेला होता. यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी मंचावर त्याने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रितेश भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

“तुमच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची आठवण आणि कर्तृत्व आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील दादा” असं सांगत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना…

“नमस्कार! २८ जानेवारीचा सूर्य ‘सकाळ’ घेऊन येण्याऐवजी ‘काळरात्र’ घेऊन आला. एक दु:खद बातमी आली… त्या बातमीने जो धक्का दिला, त्यातून मीच काय अजूनही अख्खा महाराष्ट्र सावरलेला नाहीये. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी यांचं अपघाती निधन झालं. ही घटना फार वेदना देणारी आहे. कारण, ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर, आपले लाडके ‘दादा’ होते. आपण सगळेजण त्यांना प्रेमाने, आदराने अजित दादा म्हणायचो. आज हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला दादांना काहीतरी सांगायचंय…
प्रिय दादा, आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल असं बोलावं लागेल…हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरंतर, तुमच्या शब्दाने, शैलीने, नजरेच्या धाकाने समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद तुमच्यात होती, तुमच्या शब्दातच ताकद होती. पण, तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. दादा, तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा त्रिवेणी संगम आहे. तुमचं रागावणं सुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षे रखडलेली कामं तुमच्या एका आदेशावर पटकन मार्गी लागायची आणि म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील कामाचा माणूस होतात. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं तुम्ही सोनं केलंत. तुमचा दिलखुलास अंदाज, मिश्किल स्वभाव…प्रत्येकाला आठवत राहील. आपल्याच कार्यकर्त्याला ‘लव्ह यू’ म्हणताना… “अरे मला काय लव्ह यू म्हणतोयस, बायकोला म्हण” म्हणजे आधी कुटुंबाकडे बघ, गावाकडे लक्ष दे! हे सांगणारा माणूस आता राहिला नाहीये दादा…तुमची जागा कधीच कुणी घेऊ शकणार नाही हे अगदी खरंय! कारण, तुमच्यासारखी राजकारणाची जाण आणि माणुसकीचं भान असलेला नेता आता शोधून सापडणार नाही.
आपल्या महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बापमाणसं वेळेआधीच सर्वांना पोरकं करून गेली. माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर आर पाटील साहेब, प्रमोद महाजन साहेब आणि आता तुम्ही… तुम्ही सगळ्यांनी एकच धर्म पाळला. तो म्हणजे महाराष्ट्र धर्म. म्हणूनच, आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावलेत. दादा तुम्ही जिथे कुठे असाल…तिथून आमच्याकडे पाहत नक्की म्हणत असाल…अरे रडताय काय? कामाला लागा. दादा तुम्ही कालही प्रेरणा होतात आणि आजही आमची प्रेरणा आहात, उद्याही प्रेरणा असाल. हीच प्रेरणा घेऊन मी सुद्धा काम सुरू करतोय आणि आपला हा शो सुरू करतो. तुमचाच रितेश विलासराव देशमुख!”

दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, ३१ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला.