मराठीसह बॉलीवूड सिनेविश्वात अधिराज्य गाजवणारा महाराष्ट्राचा ‘लय भारी’ अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून रितेश त्याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात एका मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता कपिल होनराव रितेशच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणार आहे. कपिल रितेशचा मोठा चाहता आहे. आयुष्यात एकदा तरी रितेश सरांना भेटायचं हे कपिलचं स्वप्न होतं आणि ‘राजा शिवाजी’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने अभिनेत्याचं खऱ्या अर्थाने नशीब उजळलं.
पण, गुढीपाडव्याच्या शुभदिवशी कपिलच्या आयुष्यात आणखी एक खास गोष्ट घडली आहे. ती म्हणजे रितेश देशमुखने पहिल्यांदाच त्याला फोन केला होता. याबद्दलची खास पोस्ट शेअर करत कपिलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कपिल सांगतो, “यापेक्षा बेस्ट गुढीपाडवा होऊ शकतो का? जेव्हा सुपरस्टार दिग्दर्शक तुम्हाला स्वत: फोन करतात. रितेश देशमुख सरांचा स्वत:हून फोन कॉल येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजी सिनेमाचा मी एक भाग याचा मला प्रचंड अभिमान आहे. राजा शिवाजी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होतोय.”
“मी जवळपास एक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं पण, कधीच त्यांचा नंबर मागितला नाही. आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आणि घरी यायचं…हेच मी इमानदारीने केलं. खूप वेळा वाटलं…आपण त्यांचा नंबर मागूयात…पण, कधीची हिंमत झाली नाही. मग स्वत:लाच सांगितलं…ठीक आहे, आपलं काम आपण करत राहुयात आणि आज स्वत: रितेश देशमुख सरांचा फोन आला. ते खरंच सुपरस्टार आहेत.” असं कपिलने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर ‘धुरंधर २’च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रदर्शित करण्यात आला आहे. आता हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये रितेश देशमुखसह जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
