Riteish Deshmukh : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा ८ मार्चला प्रक्षेपित केला जाणार आहे. यंदा या सोहळ्याचं होस्टिंग लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख व अमेय वाघ हे दोघेजण मिळून करणार आहेत. यावर्षी अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला यावर्षी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. रितेश आणि अमेय या दोघांच्या होस्टिंगने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे.

रितेश देशमुख नेहमीच त्याच्या हटके स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतो. ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात ग्रँड एन्ट्री घेत रितेश सूत्रसंचालनाला सुरुवात करणार आहे. यावेळी त्याच्या सोबतीला अमेय सुद्धा होता. सगळ्या प्रेक्षकांनी हा भव्यदिव्य सोहळा शेवटपर्यंत पाहावा यासाठी अभिनेत्याने सगळ्या प्रेक्षकांना खास पारंपरिक पद्धतीने आमंत्रण दिलं आहे. यावेळी रितेशने त्याच्या गावची आठवण सुद्धा सांगितली आहे.

रितेशचं गाव लातूरमध्ये बाभळगाव येथे आहे. याठिकाणी देशमुख कुटुंबीयांचं सुंदर असं घर आहे. ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात रितेश प्रेक्षकांना या सोहळ्याचं आमंत्रण देत म्हणाला, “माझ्या लहानपणी आमच्या बाभळगावला… गावात काही शुभकार्य असलं की, जवळच्या लोकांना पत्रिका नाहीतर ओंजळीने तांदूळ देऊन आमंत्रण द्यायचे. हे आमंत्रण स्वीकारून सगळे जण आवर्जून या शुभकार्याला उपस्थित राहायचे.” ही आठवण सांगताना रितेश स्वत: ओंजळीत तांदूळ घेऊन उभा होता.

रितेशने त्याच्या गावचा किस्सा सांगितल्यावर अमेयने सुद्धा त्याप्रकारे ओंजळीत तांदूळ घेऊन प्रेक्षकांना खास आवाहन केलं आहे. अमेय म्हणतो, “नमस्कार! घरचं कार्य आहे. परंपरा, मांगल्य, संस्कार जपत पंचविशी गाठलीये. यायला लागतंय. आपल्या हक्काचा झी गौरव आता पंचवीस वर्षांचा झालाय… हा सोहळा नक्की पाहा”

दरम्यान, रितेश देशमुखला या सोहळ्यात एक खास भेट दिली जाणार आहे. रितेश देशमुख आणि त्याचे वडील महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणाऱ्या एका पत्राचं वाचन होणार आहे. या पत्रवाचनानंतर रितेश भावुक झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.