Riteish Deshmukh slams Janhvi Killekar: बिग बॉस मराठीचा हा आठवडा जान्हवी किल्लेकरमुळे चर्चेत राहिला. जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्याने अनेक मराठी कलाकार भडकले होते. बिग बॉसवरही प्रचंड टीका झाली. जान्हवीने पंढरीनाथ कांबळेसाठी वापरलेली भाषा अत्यंत वाईट होती, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका केली होती. या सगळ्या प्रसंगानंतर या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला आहे.
कलर्स मराठीने नुकताच बिग बॉस मराठीतील भाऊचा धक्क्याचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश देशमुख जान्हवीवर भडकल्याचं दिसतंय. जान्हवीची दादागिरी बंद करणार, घरातून बाहेर काढणार असं रितेश प्रोमोमध्ये म्हणत आहे.
प्रोमोमध्ये नेमकं काय?
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश प्रोमोमध्ये म्हणतो, “जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना, ए मी बाहेर काढेन. तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढतो. दरवाजा उघडा.” रितेशने हे बोलताच जान्हवी रडत सर्व स्पर्धक बसलेले असतात तिथून उठून जाताना दिसते.
जान्हवी पंढरीनाथ कांबळेला काय म्हणाली होती?
या आठवड्यातील ‘सत्याचा पंचनामा’ या पहिल्याच टास्कमध्ये दोन्ही ग्रुपच्या सदस्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर जान्हवी म्हणाली, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात तोंडासमोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.”
“एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…
यावर लिव्हिंग एरियामध्ये वर्षा ताईंना पॅडी म्हणाला, “ही आपल्या अॅक्टिंगवर वगैरे बोलतेय हिला या गोष्टी बाहेर एवढ्या भोवतील…खूप त्रास होईल. कारण, आम्ही एका इंडस्ट्रीत आहोत आणि कधी ना कधी नक्कीच क्लॅश होणार… आय होप तिने असा स्टॅण्ड घेतला पाहिजे की, पॅडी कांबळे असेल तर मी काम करणार नाही. तिने हा स्टॅण्ड नाही घेतला तरीही मी हे नक्कीच करू शकतो.”
या संपूर्ण प्रकरणानंतर विशाखा सुभेदार, सिद्धार्थ जाधव, सुरेखा कुडची, पंढरीनाथ कांबळेची मुलगी या सर्वांनी पोस्ट करून जान्हवीवर टीका केली होती. दुसऱ्या दिवशी जान्हवी शोमध्ये पंढरीनाथची माफी मागताना दिसली होती.