‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन येत्या ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज रात्री ८ वाजता या शोचं प्रक्षेपण केलं जाईल. कार्यक्रमाचा प्रीमियर होण्यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’चा होस्ट रितेश देशमुखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यंदाचा सीझन कसा असेल, थीम काय असेल याबाबतची माहिती प्रेक्षकांना दिली. यावेळी रितेशने सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

“सध्या निवडणुकांच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. त्यामुळे यंदा बिग बॉसच्या घराचं तिकीट कुणाला मिळालंय की नाही?” असा प्रश्न रितेश देशमुखला विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने असं काही उत्तर दिलं की सर्वत्र एकच हशा पिकला.

बिग बॉसचं तिकीट कुणाला मिळालंय? यावर रितेश म्हणाला, “ज्यांना पार्टीची तिकीटं मिळाली नाहीयेत त्यांना बहुतेक ही तिकीटं मिळतील….खरं सांगायचं झालं तर, मला अजूनतरी याबद्दल कल्पना नाही. समजा एखाद्याला पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथे मिळू शकेल की नाही हे सुद्धा माहिती नाही” यावर रितेशसह या कार्यक्रमात उपस्थित असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली, “सर हे तिकीट मिळवणं त्यापेक्षा जास्त कठीण आहे.” यानंतर एकच हशा पिकल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

याशिवाय रितेशला, “तुला आणि जिनिलीयाला टेलिव्हिजनवरील एखाद्या कार्यक्रमात एकत्र सहभागी व्हायला आवडेल का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “जर समोरच्या लोकांचं बजेट असेल तर नक्कीच” रितेशचं हे उत्तर ऐकून सुद्धा उपस्थितांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, यंदा ‘बिग बॉस मराठी’चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत असून, “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या रोमांचक थीमसह नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी हे घर पूर्णपणे तयार आहे. १०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल १०० दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.