‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच रोहन गुजर. यामध्ये त्याने जान्हवीच्या भावाची म्हणजेच पिंट्याची भूमिका साकारली होती. रोहनने पिंट्याची भूमिका इतकी छान साकारली होती की, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पिंट्यासारखा भाऊ असावा असं वाटू लागलं होतं. नुकतीच या अभिनेत्याने एक खास सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

रोहनने काही दिवसांपूर्वी बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच्या पत्नीचं डोहाळेजेवण थाटात पार पडलं होतं. याशिवाय रोहन आणि त्याच्या पत्नीने मॅटर्निटी फोटोशूट सुद्धा केलं होतं. आता अभिनेत्याच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन झालं आहे. रोहनला गोंडस मुलगा अन् मुलगी झाली आहे. बाबा झाल्यावर तीन महिन्यांनी अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. तसेच आपल्या दोन्ही मुलांची नावंही इन्स्टाग्रामवर जाहीर केली आहेत.

रोहन गुजर लिहितो, “३ महिने…२ Souls अन् १ कुटुंब”! अभिनेत्याने मुलीचं नाव ठेवलंय…’आद्या’ आणि त्याच्या मुलाचं नाव आहे ‘अद्वय’. आद्या-अद्वयच्या चिमुकल्या हातांची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळतेय. याशिवाय या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोहनने ‘३ महिने, Twins’ असे हॅशटॅग सुद्धा वापरले आहेत.

रोहनने ही आनंदाची बातमी जाहीर करताच संपूर्ण मनोरंजन विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. रसिका वेंगुर्लेकर, स्वरदा ठिगळे, नंदिता पाटकर, अभिजीत केळकर, पल्लवी पाटील यांसह अनेक कलाकारांनी रोहन आणि कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, रोहनने ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेनंतर ‘बन पाव’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘नवी जन्मेन मी…’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये स्नेहल देशमुखबरोबर लग्नगाठ बांधली. हे दोघंही अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. आता लग्नानंतर जवळपास ८ वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. रोहनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो ‘सन मराठी’च्या ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय तो ‘आमने सामने’ नाटकात सुद्धा काम करतोय.