मराठी आणि हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे यांच्या लेखन कारकीर्दीला ३ ऑक्टोबर रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तीन दशकांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी जवळपास ७० मालिकांचे तब्बल ४०,००० भाग लिहिले असून, ७५ मालिकांची शीर्षक गीते त्यांच्या लेखणीतून साकारली आहेत.
मराठी दूरदर्शनवरील पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनी’ पासून रोहिणी निनावे यांनी आपल्या लेखन कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर घरकुल, अवंतिका, अवघाचि संसार, ऊन पाऊस, अधुरी एक कहाणी, कळत नकळत, मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल, मुलगी झाली हो, मोलकरीण बाई, माझ्या नवऱ्याची बायको, अगं बाई सासुबाई, अजूनही बरसात आहे, माझी तुझी रेशीमगाठ, स्वाभिमान, मी संसार माझा रेखिते अशा अनेक लोकप्रिय मालिकांच्या भागांचे लेखन त्यांनी केले.
रोहिनी निनावेंच्या हिंदी मालिका
मराठीबरोबरच हिंदी हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या लेखनाचा ठसा उमटवला. कुसुम, संजीवनी – मेडिकल बून, तुम्हारी दिशा, इस प्यार को मैं क्या नाम दूं, बाजीगर, पालकी, यहाँ मैं घर घर खेली, प्यार का दर्द है, मेरे रंग में रंगने वाली, मनपसंद की शादी यांसह अनेक हिंदी मालिकांचे लेखन त्यांनी केले आहे.
रोहिणी निनावे यांच्या लेखणीतून साकारलेली अनेक शीर्षक गीतेही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अवघाचि संसार, कुंकू, पुढचं पाऊल, स्वप्नांच्या पलिकडले, फुलाला सुगंध मातीचा, संस्कार, ठिपक्यांची रांगोळी, लपंडाव, आई बाबा रिटायर होत आहेत, आमच्या लाडक्या नाईक बाई, मी संसार माझा रेखिते आदी मालिकांची शीर्षक गीते त्यांनी लिहिली आहेत.
रोहिणी निनावे यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे वेळेवर काम पूर्ण करण्याची शिस्त, बदलत्या काळानुसार लेखनात आवश्यक बदल करण्याची क्षमता, प्रेक्षकांची नस ओळखून त्यानुसार कथानक आणि व्यक्तिरेखा साकारण्याची हातोटी आणि त्याचवेळी लेखनाचा दर्जा कायम राखण्याची जिद्द त्यांच्यात आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. दामिनी, अवंतिका, कल्याणी पटवर्धन, आसावरी, अक्कासाहेब, राधिका सुभेदार, सौरभ जहागीरदार, हर्षवर्धन भोसले, गुरुनाथ सुभेदार, यश पटवर्धन, विलास पाटील यांसारख्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
लेखनाचा हा प्रतिभावान वारसा त्यांना त्यांचे दिवंगत वडील वसंत निनावे यांच्याकडून मिळाला. उच्च शिक्षण, विपुल वाचन आणि जीवनातील विविध अनुभवांमुळे त्यांचे लेखन अधिक समृद्ध झाले. वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढ-उतार तसेच प्रकृतीच्या आव्हानांवर मात करत त्यांनी तीन दशके सातत्याने मालिका आणि शीर्षक गीतांचे लेखन केले.
तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणे ही केवळ कारकीर्द नसून एक प्रकारची तपश्चर्याच आहे. रोहिणी निनावे यांनी ही तपश्चर्या अथकपणे जपली असून, त्यांच्या लेखणीतून भविष्यातही दर्जेदार कथा, व्यक्तिरेखा आणि गीतांचा प्रवास सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून आणि दूरदर्शन क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
