मराठी आणि हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय लेखिका आणि गीतकार म्हणून रोहिणी निनावे यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी ‘घरकुल’, ‘अवंतिका’, ‘अवघाचि संसार’, ‘ऊन पाऊस’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘कळत नकळत’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांचं लेखन केलं आहे. मात्र, करिअरमध्ये अनेकदा काही टीमकडून नकारही दिला जातो, याबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
इंडस्ट्रीत कलाकारांना अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागतो तर, लेखकांच्या बाबतीत असं कधी झालंय का? एखादी मालिका लिहायला सुरुवात केली आणि नंतर अचानक कंटिन्यू करता येणार नाही असं सांगितलं जातं. याबद्दल रोहिणी निनावे ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना म्हणाल्या, “हो…असं खूप वेळा घडतं. तुम्ही इतक्या मालिका लिहिल्या आहेत किंवा आधी एवढं काम केलंय म्हणून तुम्ही ग्रेट झालात असं नसतं. टीमला काही गोष्टी पटल्या नाहीत तर, लगेच निर्णय घेतले जातात. आता एक प्रसिद्ध मालिका होती, तर ९ भागांनंतर मग त्यात बदल करण्यात आला. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर, त्यामधील भूमिकांवर सुद्धा मी खूप काम केलं होतं. पण, नंतर निर्मात्यांना असं वाटलं की, मी चांगलं लिहित नाही म्हणून त्यांनी मला काढून टाकलं.”
रोहिणी निनावे पुढे म्हणाला, “अशा गोष्टी घडल्या की, अर्थातच वाईट वाटतं. माझं काय म्हणणं असतं, तुम्ही बोलून सांगू शकता की, आम्हाला हे-हे अपेक्षित आहे. आता रहस्य किंवा विनोदी शैलीची मालिका असती तर, मी मान्य केलं असतं की, बाबा मला नाही जमलं. पण, आई कुठे काय करतेसारख्या मालिकेत मला न जमण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांना असं का वाटलं हे मला अजूनही समजलं नाहीये. त्याच्यात नाट्य, इमोशन्स नाहीत असं ते म्हणत होते, त्याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. आजवर मला याबाबत स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये.”
“मी तेव्हा नागपूरला गेले होते, तिथून परत आल्यावर मला समजलं की, ही मालिका आता पुढे मी लिहिणार नाहीये. आमच्या बाबतीत हे फार क्वचित होतं. कारण, मराठी लोकांना माहितीये की मी लेखिका म्हणून काय आहे. पण, अमराठी लोकांना समोरचा माणूस सांगेल तसंच घडणार. मी त्यावेळी त्यांना समजावून सांगू शकत होते पण, म्हटलं ठिके. बरं मी २५ वर्षे सातत्याने लिहितेय…जशी परिस्थिती बदलते, तसा लेखनाचा पॅटर्नही बदलतोय. आधी आम्ही खूप मोठमोठे सीन्स लिहायचो पण, आता तसं नाहीये. दीड मिनिटांचा वगैरे सीन असतो. आता कसंय, काहीतरी सतत घडत राहिलं पाहिजे. त्यामुळे लेखनातही मी बराच बदल केलाय. आधी भाषा थोडी पुस्तकी होती, साहित्यिक भाषा होती. पण, आता असं नाहीये. आता आम्ही लिहिलेले संवादही ते बोलतील असं नाहीये…कलाकारांचं असं म्हणणं असतं मतितार्थ पोहोचला ना मग झालं. म्हणजे काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.” असं मत रोहिणी निनावे यांनी मांडलं.
