Girish Oak Talk About Rohit Arya : मुंबईतील पवईमधील आर. ए. स्टुडिओमध्ये शॉर्ट फिल्मच्या ऑडिशनसाठी बोलावून १७ अल्पवयीन मुलांना या ओलीस ठेवल्याची घटना घडली. रोहित आर्यनं गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी बनावट ऑडिशन आयोजित करून, सुमारे १०० विद्यार्थ्यांना बोलावून घेतले होते. त्यापैकी बहुतेकांना परत पाठवल्यानंतर त्यानं १७ मुलं आणि दोन वृद्धांना स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलं होतं.
पोलिसांनी वॉशरूममधून प्रवेश करून १७ मुलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोहित आर्यचा मृत्यू झाला. मुलांना सोडविण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. आणि त्यात रोहित आर्यच्या छातीवर गोळी लागली. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, आर्य यानं याच प्रकल्पासाठी अनेक मराठी कलाकारांशीही संपर्क साधला होता.
आता या चौकशीतून समोर आलं आहे की, रोहित आर्य यानं अनेक मराठी कलाकारांशी संपर्क साधून त्यांच्यासह चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांचाही समावेश होता. त्याबद्दल अभिनेते गिरीश ओक यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सांगितलं की, ते २९ ऑक्टोबर रोजी म्हणजेच घटनेच्या आदल्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजता ते पवईतील आर. ए. स्टुडिओत गेले होते. ते म्हणाले, “माझ्याबरोबर काही काळ काम केलेल्या एका व्यक्तीनं रोहित आर्यच्या वतीनं मला त्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी संपर्क केला होता.”
“सकाळी ११ वाजता स्टुडिओत पोहोचलो आणि…”
गिरीश ओक पुढे म्हणाले, “मला सांगण्यात आलं होतं की, रोहित आर्य यानं यापूर्वी काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे मी त्याला भेटायला तयार झालो. मी सकाळी ११ वाजता स्टुडिओत पोहोचलो आणि तो सुमारे ११.०५ वाजता आला. आम्ही एका सामाजिक विषयावर आधारित प्रोजेक्टबद्दल चर्चा केली. त्यावेळी मी पाहिलं की, स्टुडिओमध्ये अनेक मुलं होती. त्याबद्दल मी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं की, ती एका कार्यशाळेसाठी आली आहेत. थोड्या वेळानं ती मुलं माझ्याभोवती जमली आणि माझ्याबरोबर ग्रुप फोटो काढला. बाहेर काही पालकांनीही माझ्यासह सेल्फी घेतल्या. नंतर साधारण १२ वाजता मी स्टुडिओमधून बाहेर पडलो.”
रोहित आर्यनं रुचिरा जाधवलाही संपर्क साधला होता
रोहित आर्यनं फक्त गिरीश ओकच नव्हे, तर आणखी एका अभिनेत्रीलाही या ठिकाणी बोलावलं होतं. अभिनेत्री रुचिता जाधवलाही रोहित आर्यनं संपर्क साधला होता. मात्र, रुचितला काही कौटुंबिक कारणांमुळे त्या दिवशी त्याला भेटता आलं नाही. नंतर पवईतील घटनेबद्दल कळताच रुचिरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत घटनाक्रम सांगितला होता.
रुचिरासह आणखी एका अभिनेत्यानं रोहितबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. पवईतील घटनेच्या फक्त दोन दिवस आधी मराठी अभिनेता आयुष संजीवनं रोहित आर्यची भेट घेतली होती. तसेच आयुषनं त्याच्यासह आठ-नऊ वर्षांपूर्वी एकत्र कामही केलं आहे. त्याबद्दलचा खुलासा स्वत: आयुषनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्टमधून केला आहे.
