Rohit Parshuram reveals family reaction: नवनवीन मालिका, गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून एका मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कृष्णाईच्या लेकी असे मालिकेचे नाव आहे. या मालिकेत निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत आहेत. आई व तीन मुलींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे प्रोमो काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. काही अॅक्शन सीन, काही भावुक करणारे सीन पाहायला मिळत आहेत.
या मालिकेत अभिनेता रोहित परशुरामही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहितने प्रोमो पाहिल्यानंतर घरच्यांची कशी प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितले. रोहितने नुकतीच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली.
रोहित परशुराम काय म्हणाला?
या मुलाखतीत त्याला विचारले की पत्नी पूजाची काय प्रतिक्रिया होती? यावर तो म्हणाला, “‘झी मराठी’च्या इन्स्टा पेजवर आलं की शंकरला भेटायला तयार राहा. मला सुट्टी होती, तर त्या दिवशी आम्ही भोरमध्ये होतो. मला वाटलं की सात वाजता इन्स्टाग्रामवर प्रोमो येईल, त्यामुळे आम्ही सगळे हातात मोबाईल घेऊन बसलो होतो. साडेसात वाजले तरी प्रोमो आला नाही. मला वर्कआऊट करायचं होतं. मी पूजाला सांगितलं की बहुतेक प्रोमो ९ वाजता येईल. मी जीमला जाऊन येतो.”
अभिनेता म्हणाला, “भोरमध्ये वीज पडली होती, त्यामुळे अनेकांचे टीव्ही बंद पडले होते. आमचाही टीव्ही बंद पडला होता. तो दुरुस्तीसाठी दिला होता. मी जीमला गेलो, त्यावेळी टीव्ही दुरुस्त करून घरी आणला जोडला. टीव्ही लावला आणि दुसऱ्या कि तिसऱ्या मिनिटाला प्रोमो आला. ती बाईकवरची एन्ट्री दिसली.”
पुढे तो म्हणाला, “मी पूजाला खूप वेळा प्रोमो कसा आहे, याबद्दल सांगितलं होतं. मी बाईकवरुन येणार, हवा येणार, नाव दिसणार, केस उडणार वगैरे असं सगळं सांगून झालं होतं. तिने प्रोमो पाहिल्यानंतर ती खूप खूश होती. तिने मला फोन केला आणि म्हणाली की कसला हिरो दिसतोयस तू? एकदम भारी प्रोमो झाला आहे. ती पुढे काहीतरी बोलणार, तितक्यात रूहीने फोन तिच्या हातातून घेतला आणि मला म्हणाली की ती दिदी तुला बोलली की ए हिरो हो बाजूला… ती असं का बोलली? मग मी तिला समजावून सांगितलं की तिला तसं म्हणायला सांगितलं होतं. आपण तिला सांगूयात की तसं बोलू नकोस. तर त्या दोघी खूश होत्या. मी घरी गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रोमो पाहिला. तर तो दिवस खूप छान होता”, असे म्हणत नवीन मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल रोहितने सांगितले.
