Rohit Parshuram shares emotional post: लोकप्रिय अभिनेता रोहित परशुरामला ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून ओळख मिळाली. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याने शंकर ही भूमिका साकारली आहे. मात्र, सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
रोहित परशुरामने शेअर केले पत्नीबरोबरचे फोटो
रोहितने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले, “१४ ऑक्टोबर २०११ ते १४ ऑक्टोबर २०२६.” पुढे त्याने लिहिले, “अशी अनेक वर्षे आपल्याला एकत्र घालवायची आहेत.”
पुढे त्याने लिहिले, “नवरात्र चालू आहे आणि आज हे ९ फोटो शेअर करण्यामागचं एकच कारण आहे की हेच माझं आयुष्य आहे. ह्या मुलीने मला न कधी हरू दिलं ना कधी खाली पडू दिलं.”

त्याने असंही लिहिले, “स्वप्न फक्त बघून चालत नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी जेवढी धमक स्वतःमध्ये असावी लागते, त्याहूनही अधिक पाठीवर हात असावा लागतो. आधाराचा, भिड रे तू म्हणणाऱ्या माणसाचा, तो हात या मुलीने ठेवला. कधी गरज पडली तर तोच हात कान पिळायला पुढेसुद्धा आला. मला हवेत उडू न देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे हीच पोरगी आहे.”

शेवटी त्याने लिहिले, “फार्मसी कॉलेजच्या प्रॅक्टिकल लॅब्ररीमध्ये झालेली एक अनपेक्षितपणे ओळख माझ्या आयुष्यभराच्या सगळ्या दुखण्याचं औषध बनेल असं वाटलसुद्धा नव्हतं. पण ते झालं. पूजा, प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात, काही कठीण असतात, तर काही दिवस त्याहूनही अधिक कठीण असतात. पण, या सगळ्यात आपण एकमेकांचा हात घट्ट धरून, हळूहळू, एकेक पाऊल पुढे टाकत आयुष्याचा प्रवास करत आहोत; हीच माझ्यासाठी जगातील सर्वांत आनंदाची भावना आहे. नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. गेली १५ वर्षे आपण एकत्र आहोत, याचा आनंद आहे.”
रोहितच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सहकलाकार निवेदिता सराफ यांनी तुम्ही दोघे खूप गोड दिसत आहात, अशी कमेंट केली आहे; तर सई रानडेनेदेखील कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनीही त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे.

दरम्यान, रोहित परशुरामची ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील शंकर ही भूमिका चांगलीच गाजत आहे.
