टेलिव्हिजन हे प्रेक्षकांसह कलाकारांसाठीही फार महत्त्वाचं माध्यम असतं. मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनतात तर लोकप्रियता मिळवण्यासाठी छोटा पडदा कलाकारांसाठीही महत्त्वाचं माध्यम असतं. मात्र अशातच आता लोकप्रिय अभिनेता रोनित रॉयने टेलिव्हिजनची तुलना कचऱ्याच्या डब्याशी करत कलाकारांवरही टीका केली आहे.

रोनित रॉयने १९९०च्या दशकातील दूरदर्शनवरील ‘स्वाभिमान’ या मालिकेतून पहिल्यांदा लोकप्रियता अनुभवल. त्यावेळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीची सुरुवातच झाली होती. ‘स्वाभिमान’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्याने त्याच्याशी संबंधित प्रत्येक कलाकाराला या यशाचा आनंद घेता आला. मात्र, प्रत्येक मालिकेच्या नशिबी असं यश येतं असं नाही. टेलिव्हिजनची पोहोच चित्रपटांपेक्षा कितीतरी मोठी असली, तरीही मनोरंजनसृष्टीत एक विशिष्ट श्रेणीव्यवस्था आहे, ज्यामध्ये चित्रपटातील कलाकारांना टीव्ही कलाकारांपेक्षा वरचं स्थान दिलं जातं. ही वर्गवारी आता मागे सोडण्याची वेळ आली आहे, असं अनेक कलाकारांनी म्हटलं आहे. मात्र, रोनित रॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपट आणि टीव्ही कलाकारांमध्ये स्पष्ट फरक असल्याचं सांगितलं.

रोनित रॉय नेमकं काय म्हणाला?

किंडल कास्टला दिलेल्या मुलाखतीत रोनित रॉयला चित्रपटील कलाकारांना टीव्ही कलाकारांपेक्षा वरचं स्थान देण्याबद्दल विचारण्यात आलं. तसेच टीव्ही कलाकारांना मिळणारं यश हे चित्रपट कलाकारांच्या तुलनेत कमी दर्जाचं का मानलं जातं, असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर रोनित रॉयने आपलं स्पष्ट मत मांडत म्हटलं की, “टीव्ही कलाकारांमध्ये चित्रपट कलाकारांसारखी कॅरेज नसते.” आपल्या या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट करताना तो म्हणाला, “चित्रपटातील एखादा कलाकार सार्वजनिक ठिकाणी कशा पद्धतीने येतो, हे तुम्ही पाहिलं असेल. विशेषतः तो कलाकार स्टार असेल, तर त्याची देहबोली आणि वावर वेगळाच असतो. अर्थात प्रत्येकजण एक प्रकारचा मुखवटा घालतो. आपल्यालाही तसं करावं लागतं. पण त्यांचा तो मुखवटा ग्रेसफुल, स्टायलिश आणि कूल असतो. त्यांच्यात एक विशिष्ट स्टाइल आणि क्लास असतो,” असं त्याने सांगितलं.

यानंतर त्याने टीव्ही कलाकारांची तुलना करत म्हटलं, “दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात अनेक टीव्ही कलाकार एकत्र आलेले तुम्ही पाहा. ते ज्या पद्धतीने वागतात, ते पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच मिळेल.” रोनित रॉयने पुढे सांगितलं की,तो स्वतः टीव्ही कलाकार असूनही त्याने वागण्या-बोलण्याबाबत नेहमीच काळजी घेतली आहे. “तुम्ही ज्या पद्धतीने वागता, त्यात एक विशिष्ट अंदाज असायला हवा. पापाराझी तिथे आहेत म्हणून उगाच आरडाओरडा करणं किंवा मूर्खपणासारखी वक्तव्य करणं योग्य नाही,” असं तो म्हणाला.

रोनित रॉयने पुढे चित्रपटात काम करणारे कलाकार आणि टीव्ही कलाकारांच्या कपड्यांवरही भाष्य केलं. तो म्हणाला, “चित्रपटातील कलाकार कधीही अंगप्रदर्शन करणारे कपडे घालत नाहीत असं नाही, पण त्यांच्या कपड्यांमध्ये एक विशिष्ट स्टाइल असते. सोशल मीडियावर सध्या सतत दिसणाऱ्या एका महिला कलाकाराचं नाव मला माहीत नाही, पण ती जवळजवळ काहीच कपडे घालत नाही. मग तुम्ही त्यांच्याशी वाईट पद्धतीने वागणारच ना.”

रोनित रॉयने सांगितलं की, अशा सोशल मीडिया पोस्टमधून प्रेक्षकांना थ्रिल मिळतो, मात्र त्यामुळे ते तुमचा कधीच आदर करणार नाहीत. “कारण तुम्ही काय करत आहात? खरं तर तुम्ही काहीच करत नाही. त्यामुळे मला वाटतं, हे यामागचं एक कारण आहे. याशिवाय आणखीही अनेक कारणं आहेत. मला असं वाटतं की टेलिव्हिजनवरील फार कमी कलाकारांना आपल्या प्रेक्षकांशी कसं बोलायचं हे माहीत असतं”. चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन माध्यमांमधील श्रेणीव्यवस्था कलाकार स्वतःच स्वीकारत आहेत का, असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. यावर त्याने चित्रपट हे टेलिव्हिजनपेक्षा निश्चितच वरचं माध्यम असल्याचं स्पष्ट केलं. “सिनेमा म्हणजे सिनेमा. तो कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी असतो. टेलिव्हिजन हे कचऱ्याच्या डब्याचं माध्यम आहे,” असं रोनित रॉयने स्पष्ट केलं.