टीव्ही जगतात काही रिॲलिटी शो असे आहेत, ज्यांची लोकप्रियता शिखरावर आहे. त्यापैकी एक म्हणजे कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणारा 'खतरों के खिलाडी' हा आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाबद्दल मोठ्या चर्चा होत होत्या. यंदाच्या १४ व्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांकडून अंदाज बांधले जात होते. आता खतरों के खिलाडीचा पहिला प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये स्पर्धक अवघड स्टंट करताना बेजार झाल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये स्पर्धक घाबरून ओरडताना दिसत आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, रोहित शेट्टी या पर्वात प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी शोचे शूटिंग केपटाऊनमध्ये नाही तर रोमानियामध्ये होत आहे. प्रोमोमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शेट्टीचा आवाज आहे, ज्यामध्ये तो म्हणताना दिसतो- "युरोपात गेल्यावर स्पर्धक सूट्ट्यांचा आनंद घ्यायचा विचार करत असतात, मात्र आता मूड बदलेल, वातावरण बदलेल. त्यांच्या स्वप्नातील सुट्टी लवकरच त्यांच्या वाईट स्वप्नात बदलणार आहे. आता मी रोमानियामध्ये भीतीच्या नव्या गोष्टी लिहिणार आहे."यानंतर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आधी मजा करताना आणि नंतर ती साप आणि इतर गोष्टींसोबत स्टंट करताना दिसत आहे. हा धोकादायक स्टंट करताना तिला तिचे वडीलही आठवतात. अभिनेता गश्मीर महाजनी याचा प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये तो त्याच्या भीतीवर मात करत स्टंट करताना दिसत आहे. https://www.instagram.com/reel/C8w3YCBNQSG/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== या कार्यक्रमात अनेक धाडसी स्टंट स्पर्धकांकडून केले जातात. कधी हे स्टंट हवेत हेलिकॉप्टरमधून केले जातात, तर कधी पाण्यात केले जातात. साप, मगर, विंचू, झुरळ यांच्यासोबतदेखील स्पर्धकांना स्टंट करावे लागतात. स्पर्धक हे स्टंट सादर करत असताना टीव्हीवर पाहताना प्रेक्षकांचा अनेकदा थरकाप उडतो.खतरों के खिलाडीच्या १४ व्या पर्वात कलाविश्वातील अनेक स्पर्धक कलाकारांनी भाग घेतला आहे. शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, नियती फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा, निमृत कौर अहुलवाली, शालिन भानोत, गश्मीर महाजनी हे कलाकार यात पाहायला मिळत आहेत. आता कोण आपल्या भीतीवर मात करत कार्यक्रमात टिकून राहणार आणि कोण आपल्याबरोबर भीती घेऊन घरी परतणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे.