‘कलर्स टीव्ही’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खतरों के खिलाडी १४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टंटवर आधारित असलेला ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे. अजूनपर्यंत ऑनएअर झालेला नाही. पण चित्रीकरणा दरम्यान घडणाऱ्या नवनवीन अपडेट सतत समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीबरोबर पंगा घेतल्यामुळे असिम रियाजला ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात बाहेर काढल्याचं वृत्त आलं होतं.

असिमची शालीन भनोट आणि अभिषेक कुमारबरोबर जोरदार वाद झाले. यावेळी त्याने शिवीगाळ केली; ज्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. मुळात असिम व शालिनचे वाद सुरू होते. पण शालिन हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. त्यामुळे अभिषेक या वादात मधे पडला आणि मग हा वाद आणखी पेटला. रोहितला असिमचं हे वागणं अजिबात पटलं नाही. तसंच असिमने एका टास्कवरून देखील रोहित शेट्टीशी हुज्जत घातली होती. हा टास्क जीवघेणा असून मी करणार नाही, असा असिम म्हणत होता. पण रोहितने त्याला हा टास्क करायला सांगितला. मात्र असिमने काही ऐकलं नाही. तेव्हा रोहितने त्याला सुनावलं. टास्क तज्ञांच्या देखरेखी खाली केला गेला आहे. तरीही असिम स्वतःचं म्हणण्यावर अडून राहिला. अखेर रोहित शेट्टीने त्याला कार्यक्रमाबाहेर काढलं. अशातच आता रोहितला एका स्पर्धकामध्ये ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वाचा विजेता दिसत आहे.

हेही वाचा – शरद पवार आणि ‘झपाटलेला’ चित्रपटाचं आहे खास कनेक्शन, महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

‘खतरों के खिलाडी’च्या यंदाच्या पर्वात असिम रियाजसह कृष्णा श्रॉफ, सुमोना चक्रवर्ती, शालिन भनोट, अभिषेक कुमार, नियाती फटनानी, करण वीर मेहरा, आशीष मल्होत्रा, शिल्पा शिंदे आणि गश्मीर महाजनी या सर्वांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. याच स्पर्धकांमधील एका स्पर्धकाचं रोहित खूप कौतुक केलं आहे.

‘खतरों के खिलाडी १४’ फॅन पेजवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. रोहित शेट्टीने कौतुक केलेला दुसरा तिसरा स्पर्धक कोणी नसून शालिन भनोट आहे. रोहित म्हणाला, “शालिनमध्ये त्याला ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता दिसत आहे. तो स्टंट खूप उत्कृष्टरित्या पार करत आहे.”

हेही वाचा – Video: घायल शेर लौट आया है…; बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर ३’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ तारखेला वेब सीरिज होणार रिलीज

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वातून शिल्पा शिंदे बाहेर गेल्याचं म्हटलं जात आहे. पण या येणाऱ्या अपडेट्स कितपत खऱ्या आहेत? हे कार्यक्रम सुरू झाल्यावरच स्पष्ट होईल.