Ruchita Jadhav : ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच रुचिता जाधव. २०२१ मध्ये तिने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्योगपती आनंद माने यांच्याशी लग्न केलं. रुचिताने लग्नासाठी आलेली ७१ स्थळं नाकारली होती आणि त्यानंतर तिला ७२ वं स्थळ आनंदचं आलं होतं. तिला सासरच्या कुटुंबाकडून सुद्धा नेहमीच सपोर्ट करण्यात आला. पण, परिवाराला वेळ देण्यासाठी रुचिताने स्वत:हून इंडस्ट्रीतून ब्रेक घ्यायचं ठरवलं.

आनंद माने हे रिअल इस्टेटमध्ये कार्यरत आहेत. अनेकदा रुचिताला पैशांसाठी लग्न केलं असं म्हणत ट्रोल केलं जातं. याबद्दल तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट मत मांडलं आहे. तुला सगळ्यात जास्त क्रिटिसाइज किंवा ट्रोल कशावरून केलं जातं? यावर रुचिता म्हणाली, “मी आनंदशी पैशांसाठी लग्न केलं, असं बोललं जातं. बरं, लोकांनी याबद्दलच्या असंख्य कमेंट्स माझ्या सोशल मीडियावर केल्या होत्या. मी एक-एक कमेंट डिलीट करून शेवटी मग कमेंट सेक्शन ऑफ करून टाकलं. खरंच कुटुंबीयांना सुद्धा याचा खूप फरक पडतो.”

रुचिता पुढे म्हणाली, “आता माझी आई ६० वर्षांची आहे…ती माझ्या फोटोंवरच्या सगळ्या कमेंट्स वाचते. त्यात मी तिची सगळ्यात लाडकी मुलगी आहे. आता मला त्या कमेंट्सचा फरक पडत नाही पण, माझ्या आईला या गोष्टी फार अफेक्ट होतात.”

“मी पैशांसाठी लग्न केलं’ या अशा पद्धतीच्या कमेंट्स वाचून मला कळतच नाही की, मी यावर हसू, काय उत्तर देऊ? नेमकं काय बोलू? कारण, माझं अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे थोडंतरी डोकं वापरा, अरेंज मॅरेज सेटअपमध्ये तुम्ही ज्या सोशल स्ट्रक्चरमध्ये मोठे झाला आहात, त्याच पद्धतीचं स्थळ मिळतं. माझी फॅमिली काहीतरी होती, मी काहीतरी होते म्हणून मला आनंद मानेंचं स्थळ आलं…व्हेरी सिंपल! मी आजपर्यंत कधीही प्रेमात पडलेली मुलगी नाहीये..कधीच नाही. लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलं होतं, तुम्हाला सगळं फ्रिडम आहे पण, लग्नासाठी मुलगा शोधणार आम्हीच. फक्त मुलींनाच नाही माझ्या भावाला सुद्धा स्थळ आई-बाबांनीच आणलं. तर, मी का कोणासाठी पैशांसाठी लग्न करेन? बरं तो पण उगाच माझ्याशी का लग्न करेल? माझी फॅमिली सुद्धा काहीतरी आहे म्हणूनच त्यांच्या कुटुंबाने सुद्धा माझा विचार केला.” असं रुचिताने सांगितलं.

ती पुढे म्हणाली, “अरेंज मॅरेज हे असंच असतं आणि मी हे लोकांना कसं काय समजावू? त्यापेक्षा मग मी म्हणते, ठिक आहे समजायचं ते समजा…केलं पैशांसाठी लग्न. माझ्या सासरचे लोक सुद्धा या कमेंट्स वाचतात. पण, ते कधीच बोलून दाखवत नाहीत. सासू-सासरे म्हणून त्यांनाही माझी काळजी आहे. एकंदर काय तर, ते ट्रोलिंग, त्या कमेंट्स या सगळ्या गोष्टी फॅमिलीला अफेक्ट करतात.”