Ruchita Jamdar on Trolling: ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेले स्पर्धक त्यांच्या खेळामुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या खेळाची, त्यांच्या वागण्या-बोलण्याची, टास्कमधील त्यांच्या परफॉर्मन्सची, तसेच इतर स्पर्धकांबरोबर असलेल्या त्यांच्या बॉण्डिंगची सतत चर्चा रंगते. अनेकदा त्यांचे कौतुक होते, तर अनेकदा त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
विशेष म्हणजे जेव्हा हे स्पर्धक एलिमिनेट होऊन घराबाहेर पडतात, त्यावेळी अनेकदा त्यांना त्यांच्या खेळावरून बोलले जाते. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या जातात. त्याबद्दल अनेकांना वाईट वाटते, काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. आता बिग बॉस मराठीच्या ६ व्या पर्वात सहभागी झालेली रुचिता जामदार मोठ्या चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात तिने तिच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
घरातील स्पर्धकांबरोबर झालेली तिची भांडणे, विशाल कोटियनबरोबरची मैत्री या सगळ्याचीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. प्रेक्षकही वेळोवेळी तिच्या खेळाबद्दल व्यक्त होते. अनेकांना तिचा खेळ आवडला, तिच्या खेळाचे कौतुक झाले; तर अनेकांनी तिला ट्रोलही केले. काही दिवसांपूर्वीच एलिमिनेट होऊन, ती बिग बॉसच्या घराबाहेर पडली. त्यानंतर तिने विविध मुलाखतींतून तिच्या खेळाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल वक्तव्य केले.
“आता मला सवय झाली आहे”
नुकतीच रुचिता जामदारने लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत रुचिता ट्रोलिंगबद्दल बोलली. ती म्हणाली, “खरं तर मला ट्रोलिंग वगैरे या गोष्टींचा फरक पडला नाही. सुरुवातीला पडला होता. जेव्हा मी नुकतीच रिअॅलिटी शोमध्ये काम करायला सुरुवात केली होती, त्यावेळी मला या गोष्टींचा फरक पडायचा. ‘रोडीज’मध्ये इतकं ट्रोलिंग केल्यानंतर आता मला सवय झाली आहे.”
“तरी लोक मला माझ्या भुवयांवरून…”
पुढे ती म्हणाली, “प्रामाणिकपणे सांगायचं, तर आता मी त्या गोष्टींचा आनंद घेत होते. मीम्स वगैरे माझ्यावर बनतात, रोस्ट करतात, त्यावर मी हसते. ते सगळं मी स्वत:हून बघते. मला ते बघायला मजा वाटते. मला आता आत्मविश्वास आला आहे.”
रुचिता असेही म्हणाली, “मी तोंडाला मास्क लावून बाहेर गेले, तरी लोक मला माझ्या भुवयांवरून ओळखतात. आता मला छान वाटत आहे. काल मी कॉलेजमध्ये गेले होते. लोकांना आधी हे माहीत नव्हतं की, रुचिता या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काल गेल्यानंतर लोकांना धक्का बसला होता. खूप छान वाटतंय की, लोक ओळखत आहेत. मी जेव्हा बिग बॉसच्या घरात होते, तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की, इतका आदरही मिळतोय.”
दरम्यान, आता बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक राहिले आहेत. त्यापैकी कोणता स्पर्धक या सीझनच्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरणार हे, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
