Bigg Boss Marathi 6 Fame Ruchita Jamdar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. अनेक स्पर्धकांची आतापर्यंत घरातून एक्झिट झाली; तर काही नवीन स्पर्धकांची एन्ट्री झाली. गेल्या आठवड्यात शनिवारी स्पर्धक रुचिता जामदारने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला. त्यानंतर घराबाहेर आल्यानंतर आता रुचितानं ‘बिग बॉस’मधील तिच्या प्रवासाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
मूळची कोल्हापूरमधून असलेल्या रुचिताने यापूर्वीसुद्धा ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. परंतु, तिला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ते ‘बिग बॉस मराठी’मुळेच. रुचिता सुरुवातीपासूनच आक्रमक होती. घरातील अनेक स्पर्धकांबरोबर तिचे वाद झाले. तिची बोलण्याची पद्धत, भाषा व राग याबद्दल घरातील इतर स्पर्धक अनेकदा तिला बोलत होते. तर भाऊच्या धक्क्यावर स्वत: रितेश देशमुखनेही तिला याबद्दल सांगितलं आहे. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिनं तिचा प्रवास, इतर स्पर्धक आणि घरातील तिच्या काही जवळच्या माणसांबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिनं काही स्पर्धकांबद्दल रागही व्यक्त केला आहे. रुचिता नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
घराबाहेर आल्यानतंर रुचिता काय म्हणाली?
‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना रुचिताला घराबाहेर आल्यानंतर एपिसोड पाहिलेत का, तुला काय वाटतं तुझं काय चुकलं? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी एपिसोड नाही पाहिले. तितका वेळ मिळाला नाही; पण मला असं वाटतं की, शेवटी मी सुधारायला लागले तेच चुकलं. कारण- शेवटचे दोन आठवडे मी भांडणं नाही केली. बोलण्यात थोडा बदल केला; पण तेच कुठेतरी लोकांना अचानक मोठा बदल झाल्यासारखा वाटला. मला तरी हेच कारण वाटतं की, मी बाहेर आलीये यामागचं.”
रुचिताला पुढे तिच्या बोलण्याच्या आक्रमक पद्धतीबद्दल विचारल्यानतंर ती म्हणाली, “ही खूप सामान्य भाषा आहे. गावाकडे असंच बोललं जातं. इतरही लोक बोलायचे; पण माझंच बोलणं दाखवलं गेलं. मी शिव्या देत नव्हते. इतर काही लोक होते ते चारित्र्यावर बोललेत. आई-वडिलांवरून शिव्या दिल्या आहेत. खूप घाण बोललेत. राखी बोलली आहे; पण ती बोलली म्हणून गमतीनं घेतलं आणि मी बोलले, तर वेगळ्या अँगलनं घेतलं गेलं.”
तन्वी घरात धूम्रपान करायची!
रुचिता तन्वीला खरकटी म्हणाली तेव्हा घरात गदारोळ झाला होता आणि रितेश देशमुखनेही यावरून रुचिताची शाळा घेतलेली. रुचिता त्याबद्दल स्प्ष्टीकरण देत म्हणाली, “मी कधीच वेगळ्या अर्थानं तो शब्द वापरला नव्हता. मला तन्वीचा स्वभाव सुरुवातीलाच कळला होता. तिला माहीत होतं की, मी कशी आक्रमक आहे. तिला पाहिजे होतं की, मी यामध्ये कुठेतरी हाणामारी करावी आणि घरातून बाहेर जावं. म्हणून तिनं एक नवीन (स्ट्रटेजी)काढली होती की, रुचिताच्या इतक्या जवळ जायचं की, कुठेतरी धक्काबुकी होईल. आता साहजिकच हे टेलिकास्ट झालं नाहीये; पण शोमध्ये सगळ्यांना माहीत होतं की, मला धूम्रपानाचा (स्मोकिंगचा) खूप त्रास आहे. मला तो वास सहन होत नाही. तन्वी प्रत्येक भांडणाआधी धूम्रपान करायची आणि माझ्या खूप जवळ येऊन बोलायची, जे मला सहन होत नव्हतं. कदाचित ती हे मुद्दाम करत होती की, मी तिला धक्का देण्याची कृती वगैरे करेन म्हणून मी त्यावेळी तिला खरकटी म्हटलं होतं. कारण- मला तो वास येत होता; पण त्या शब्दाचा खूप वेगळा अर्थ काढण्यात आला. मी भाऊच्या धक्क्यावर याबद्दल स्पष्टीकरणही दिलं होतं; पण ते दाखवण्यात आलं नाही. हे मला बाहेर आल्यानंतर कळलं.”
