Ruchita Jamdar’s Brother Shares Emotional post: ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वाची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होते. दर आठवड्याला या शोमधील एक स्पर्धक घराबाहेर पडतो. नुकतीच रुचिता जामदार घराबाहेर पडली.

अगदी पहिल्या दिवसापासून रुचिताने बिग बॉसच्या घरात वेगळे स्थान निर्माण केले होते. विशालबरोबरची तिची मैत्री चर्चेचा विषय ठरली. अनेकदा तिने वापरलेल्या शब्दांवरून ऐकून घ्यावे लागले. इतर स्पर्धकांबरोबरच्या तिच्या भांडणांनी लक्ष वेधून घेतले. आता रुचिता बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“जगासाठी तू एखादी…”

आता रुचिता घराबाहेर पडल्यानंतर तिच्या जवळच्या एका व्यक्तीने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. रुचिताच्या भावाने या पोस्टमध्ये लिहिले, “तुला असं घट्ट मिठीत धरताना आज मनावरचं एक खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. तू त्या घराबाहेर आलीस आणि तुला असं उचलून घेतलं, तेव्हा मला जाणवलं की जगासाठी तू एखादी कंटेस्टंट असशील. पण, माझ्यासाठी तू आजही तीच छोटी रुचिता आहेस, जी लहानपणी गोष्टी सांगायची, नाचायची, गावातल्या मातीत खेळण्यात रामायची, दरवर्षी वर्गात पहिली यायची.”

पुढे लिहिले आहे, “त्या बंद खोलीत तू एकटी झुंज देत होतीस, पण बाहेर मी प्रत्येक क्षणी तुझ्यासाठी श्वास रोखून धरत होतो. आज तुला सुखरूप आणि इतक्या खंबीरपणे माझ्या समोर उभं पाहिलं, मला सगळं जग जिंकल्यासारखं वाटतंय.”

“आज सोशल मीडिया बघताना, लोकांचं तुझ्यावरचं ते भरभरून प्रेम पाहून डोळे भरून येतात. तू फक्त एक स्पर्धक म्हणून तिथे गेली नव्हतीस, तर तू त्या शोची एक ओळख बनून बाहेर आलीस. अनेक जण येतात आणि जातात, पण काही लोक आपला ठसा उमटवून जातात. हा सीझन कदाचित कोणा एकाच्या नावावर संपेल, पण प्रेक्षकांच्या मनात मात्र हा रुचिताचा सीझन म्हणूनच ओळखला जाईल, याची मला खात्री आहे.”

“तू तिथे कोणासमोर झुकली नाहीस, स्वतःचा खरेपणा कुठेही कॉम्प्रमाईज केला नाहीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू रुचिता म्हणून जगलीस. लोकांच्या मनात घर करण्यासाठी कोणत्याही ट्रॉफीची गरज नसते, हे तू तुझ्या वागण्यातून सिद्ध केलंस. तू रडणारी मुलगी कधीच नव्हतीस, तू संकटांना भिडणारी मुलगी आहेस आणि आज तुला असं हसताना पाहिलं की वाटतं, आपण जिंकलो.”

“आज सोशल मीडिया उघडला की तुझ्यासाठी लोकांच्या कमेंट्सचा जणू पूर आलाय. लोक अक्षरशः रडतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत आणि एकच सूर उमटतोय की रुचिता नाही तर आता शो बघण्यात अर्थच उरला नाही. हे जे काही घडतंय ना, हे कमावलेले पैसे किंवा ट्रॉफीपेक्षा खूप मोठं आहे. तुझं तिथलं सत्य, तुझा तो प्रामाणिकपणा आज लोकांच्या काळजाला भिडलाय. हे असं नि:स्वार्थ प्रेम नशिबात असल्याशिवाय मिळत नाही आणि हेच तुझं खरं यश आहे.”

“तुला मिळालेलं हे प्रेम, हे आशीर्वाद आणि तुझा हा स्वाभिमानी चेहरा यापेक्षा मोठं यश दुसरं कोणतं असू शकतं? तू आमची शान आहेस आणि कायम राहशील. तुझ्या या प्रवासात तू जे काही कमावलंस, ते कोणत्याही सोन्याच्या ट्रॉफीपेक्षा लाख पटीने अनमोल आहे. घरात आणि तुझ्या हक्काच्या माणसांच्या गर्दीत तुझं मनापासून स्वागत, माझ्या वाघिणी. तुझा प्रचंड अभिमान मला आधीही वाटत होता, आजही वाटतो आणि कायम वाटत राहील.”

या पोस्टवर रुचिताने कमेंट करत लिहिले, “भैय्या, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. तुझ्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. मी बिग बॉसमध्ये आत्मविश्वासाने लढत राहिले, कारण मला माहीत होतं की बाहेर माझा भाऊ सगळं सांभाळून घेईल”, असे म्हणत रुचिताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.