अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. ‘पुष्पा’चा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे आता ‘पुष्पा २’कडून सुद्धा प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मे महिन्याच्या अखेरीस या चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

‘पुष्पा २’चं पहिलं गाणं प्रदर्शित होताच क्षणी सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होऊ लागलं. “अंगारो का अंबर सा लगता हैं मेरा सामी…” असे या गाण्याचे बोल आहेत. श्रेया घोषालच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे. या ‘सूसेकी’ गाण्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘पुष्पा २’ चित्रपटातील या ‘सूसेकी’ गाण्यावर लोकप्रिय हिंदी अभिनेत्याबरोबर नुकताच जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरी! तिजोरी उचलून चोरट्यांनी काढला पळ, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

‘नांदा सौख्य भरे’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यांसारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऋतुजा बागवेने बऱ्याच काळाने मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. पण, यावेळी ऋतुजा मराठी नव्हे तर हिंदी मालिकेत झळकत आहे. ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’वरील नव्या मालिकेत ऋतुजा प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्यासह ‘बिग बॉस’ फेम अंकित गुप्ता प्रमुख भूमिकेत झळकत आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गायलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चं ‘जमूरे’ गाणं! याआधी अजय देवगणच्या चित्रपटात केलेलं काम

ऋतुजा आणि अंकित या दोघांनी मिळून नुकताच ‘सूसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी ऋतुजाने पिवळी साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. तर, अंकितने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल सांगायंच झालं, तर सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु, काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता डिसेंबर महिन्यात हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.