Ruturaj Phadke on Hardeek Joshi: काही मालिका वर्षानुवर्षे लक्षात राहतात. अशा मालिकांतील पात्रे, पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये, ज्या कलाकारांनी मालिकेत काम केले ते कलाकार आणि त्यांची केमिस्ट्री अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या अनेक वर्षे लक्षात राहतात.

तुझ्यात जीव रंगला ही अशाच मालिकांपैकी एक मालिका आहे. ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली होती. २०१६ ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळजवळ पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या मालिकेतील राणादा आणि पाठक बाई यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्यातील केमिस्ट्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती. तर अंजली ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकाराली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरदेखील मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसली होती.

Award Banner

आता या मालिकेतील कलाकारांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे अभिनेता ऋतुराज फडकेने हार्दिक जोशीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

“त्याला ती बुलेट विकावी लागली”

अभिनेत्याने काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्याबरोबर हार्दिक जोशी व एक बुलेट दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले, “हार्दिक जोशी आणि मी त्याच्या याच बुलेट वरून ऑडिशन देण्यासाठी सेटवरती फिरायचो. तेव्हा घरून ऑडिशन पाठवा हा ट्रेंडच नव्हता. प्रत्येक शूटिंगच्या सेटवरती जाऊन दिग्दर्शकांना भेटणे, ऑडिशन देणे हा दिनक्रम आमच्या दोघांचा असायचा.”

पुढे त्याने लिहिले, “स्ट्रगल सुरू असतानाच त्याला ती बुलेट विकावी लागली होती. पण, एक दिवस मी पुन्हा हीच बुलेट घेईन अस सतत बोलायचा, मध्ये खूप वर्ष गेली. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी गेलो होतो. तो मला म्हणाला की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यानंतर त्याने चक्क बुलेट दाखवली जी त्याच्या पार्किंग मध्ये उभी होती. आपण परत विकत घेतली, असं तो म्हणाला. आमचा दोघांचा प्रवास डोळ्यासमोर पटकन आला. दोघेही थोडे भावुक झालो.”

अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मात्र, हार्दिक जोशीच्या कमेंटने लक्ष वेधले आहे. त्याने त्याच्या भावना व्यक्त करत लिहिले, “तुमच्या सारखे पाठिंबा देणारे मित्र आयुष्यात असले की सगळे शक्य आहे.” तर राज हंचनाळे, कोमल शेटे, अभिषेक रहाळकर, अमोल नाईक, अजिंक्य राऊत या कलाकारांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, हे कलाकार विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.तसेच, ते सोशल मीडियावरही सक्रिय असते.