Sagar Karande Talks About Bigg Boss : ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाच्या ग्रँड फिनालेसाठी आता काहीच दिवस बाकी असताना मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सागर कारंडेची गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट झाली. त्याने या कार्यक्रमाचा निरोप घेतल्यानंतर आता शोबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

सागर कारंडे ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाच्या घरातील नेहमी चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक होता. त्याने तिथेही त्याच्या विनोदी शैलीने अनेकांचं मनोरंजन केलं. अशातच आता फिनालेच्या जवळ असताना एक्झिट झाल्याने त्याने खंत व्यक्त केली आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. ‘बिग बॉस’मधील प्रवासाबद्दल सागर काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

सागरने सांगितला ‘बिग बॉस’च्या घरातील अनुभव

सागर कारंडेला मुलाखतीत ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवासाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “फक्त दोन आठवडे राहिले होते… मी शंभर टक्के देत होतो. त्यामुळे वाईट वाटतंय. रडू येईल आता मला. पण, लोकांनी मला खूप पाठिंबा दिला. ठिक आहे आता आपला प्रवास इथपर्यंतच होता. मी तो प्रामाणिकपणे केला. खूप वेगळा अनुभव होता.”

Award Banner

पुढे त्याला इतके दिवस तू शोमध्ये राहशील असं वाटलेलं का असं विचारल्यानंतर सागर म्हणाला, “मला दोन-तीन वर्षांपासून बिग बॉससाठी विचारणा होत होती. मी बिग बॉस या शोला घाबरायचो. मला असं वाटायचं की हे कसं शक्य आहे? आपण रोज कुठे भांडतो, एखादी गोष्ट नाही मिळाली तर सोडून देतो. पण, बिग बॉसच्या टीमने मला पटवून दिलं की नेमका काय शो आहे हा आणि मला ते पटलं. त्यानंतर मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा ते चकित झाले.”

कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेबद्दल सागर पुढे म्हणाला, “ते म्हणाले काय तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार? फक्त दोन ते तीन आठवडे राहाल. मी म्हटलं नाही चार तरी निदान. माझी बायको आणि मुलगी बिग बॉसचे चाहते आहेत. हिंदी-मराठी दोन्ही बिग बॉस पाहतात आणि कुठलाच एपिसोड चुकवत नाही. त्यामुळे त्यांना माहीत होतं की आतमध्ये काय होतं. पण, माझी प्रतिक्रिया अशी असायची की बंद करा हे, सतत तुम्ही भांडण कसं ऐकू शकता. म्हणून त्या दोघी म्हणाल्या होत्या की फार तर फार दोन-तीन आठवडे राहशील. पण, मी तीन महिने काढले ८५ दिवस राहिलो. माझ्यासाठी हा ऑस्कर आहे.”