Sagar Karande Emotional Post For Anushri Mane: कष्टाने जेव्हा स्वप्ने पूर्ण केली जातात, तेव्हा त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते. स्वत:चे घर असावे, असे अनेकांना वाटत असते. ते मिळविण्यासाठी अनेक जण धडपड करीत असतात. अगदी अनेक कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचेही घर घेण्याचे स्वप्न असते. काही जण याबद्दल वेळोवेळी सांगतही असतात. त्यांचा आनंद त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करतात.

‘बिग बॉस मराठी ६’फेम अनुश्री मानेने नुकतेच नवीन घर घेतले. पिंपरी चिंचवडमध्ये तिने नवीन घर घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घराची पूजा केली. तसेच गृहप्रवेशही केला. त्यावेळी तिच्या अनेक मित्र -मैत्रिणींनी हजेरी लावली होती. याबरोबरच, बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील अनेक स्पर्धकांनीही हजेरी लावली होती. रुचिता जामदार, तन्वी कोलते, विशाल कोटीयन, प्रभू शेळके, धनंजय पोवार हेही उपस्थित होते. सागर कारंडेही हजर होता.

अनुश्री मानेसाठी सागर कारंडेची खास पोस्ट

आता अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत अनुश्रीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सागर कारंडे घरात आल्यानंतर अनुश्री तुमचे घरात स्वागत आहे, असे म्हणते. त्यानंतर ती पाया पडते. त्यानंतर ते खळखळून हसताना दिसत आहेत. सागर अनुश्रीच्या आईला म्हणतो की, बघितलं, पोरीनं घर घेतलं. त्यावर तिची आई “हो”, म्हणते.

व्हिडीओमध्ये पुढे ते खळखळून हसताना दिसत आहेत. त्यानंतर सागर इतरांचीही भेट घेताना दिसत आहे. धनंजय पोवार, अनुश्री व अनुश्रीची आई यांच्याबरोबर त्याने फोटोही काढले आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना सागर कारंडेने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले, “स्त्रीनं ठरवलं तर ती अख्खं जग जिंकू शकते म्हणतात. माझ्या या पोरीनं इतक्या परिश्रमानं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करून यावर शिक्कामोर्तब केलंय.
प्रयोगांच्या व्यग्रतेत पोस्ट करायला जरा उशीर झाला असला तरी वेळेत पोहोचून तिच्या आनंदात सहभागी होता आलं याचं समाधान आहे.” तसेच मला तुझा अभिमान आहे, असेही अभिनेत्याने लिहिले आहे.

सागर कारंडेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तू सागर आहेस, सर्वांना सामावून घेतोस.”‌दुसऱ्या एकाने लिहिले, “दादा तुझे पाय जमिनीवर आहेत, खूप खूप छान.” एकाने लिहिले, “सागरदादा काय बोलणार आता. माणूसच खूप भारी आहेस. तुला सागर नाव खूप शोभतं”, अशा अनेकविध कमेंट्स केल्या गेल्या आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात अनुश्री व सागर यांच्यात चांगले बॉण्डिंग पाहायला मिळाले होते. शोनंतरही त्यांच्यात उत्तम बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळत आहे.