Sagar Karande on Rakhi Sawant: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व आता अंतिम टप्प्यात आहे. आता बिग बॉसच्या घरात राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, दिपाली सय्यद, राखी सावंत, रेवा कौरसे, विशाल कोटियन हे स्पर्धक उरले आहेत. नुकताच सागर कारंडे शोमधून एलिमिनेट झाला. घरात स्पर्धक कमी उरले असले तरीही त्यांच्यातील भांडणे, वाद-विवाद कमी झाले नाहीत. स्पर्धकांमध्ये सतत वाद-विवाद होताना दिसतात. राखी सावंत व दिपाली यांच्यात नुकताच मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

राखी सतत सगळ्याच स्पर्धकांबरोबर भांडताना दिसते. ते भांडण करतील असे काहीतरी बोलते किंवा अनेकदा स्वत: भावुक होते. राकेश बापटवर प्रेम असल्याचे ती अनेकदा सांगते. प्रेक्षक राखीच्या खेळाचे वेळोवेळी कौतुक करतात. तर, काही वेळा राखीच्या खेळावर टीकाही करतात. आता सागर कारंडेने एका मुलाखतीत राखीच्या खेळाबद्दल वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

“राखीचं नातं हे गेमसाठी…”

सागर कारंडेने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कलाकट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की कोणाचं नातं हे खेळासाठी आहे, असं वाटतं? यावर सागर म्हणाला, “राखीचं नातं हे गेमसाठी आहे. मला माहित आहे की, ती सगळं गेमसाठी करत आहे.”

पुढे त्याला विचारले की राकेशबद्दल राखीच्या मनात भावना असल्याचे ती सांगते. तेही गेमसाठीच आहे का? त्यावर सागर म्हणाला, “मला वाटतं की ते गेमसाठीच आहे. खऱ्या भावना असतील तर उत्तम आहे. ती रडली आहे. ती खूप वेळा भावुक झाली आहे. मला त्या त्या वेळी वाटलं होतं की राकेशबद्दल तिच्या मनात भावना आहेत. पण, का कोणास ठाऊक, त्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. “

“बिग बॉससाठी ती काहीही करू…”

सागर असेही म्हणाला, “लांडगा आला रे आला असं आपण म्हणतो ना, कि खरोखरचा लांडगा येईल, तेव्हा कोणी विश्वास ठेवणार नाही. राखीचं ते झालेलं आहे. खरंच ती भावुक झाली असावी. त्याच्याबरोबर ती जोडली गेली असावी. पण मला ते खोटं वाटतंय. ती गेमसाठी काहीही करू शकते, याची मला खात्री आहे. बिग बॉससाठी ती काहीही करू शकते”, असे म्हणत सागर कारंडेने राखीच्या खेळाबद्दल त्याचे मत काय आहे, राकेशबद्दल ती ज्या भावना व्यक्त करत असते, त्याबद्दल त्याला काय वाटते याबद्दल सागरने स्पष्टपणे सांगितले.

याबरोबरच, सागर कारंडेने घरातील इतर सदस्यांबद्दलही त्याचे मत सांगितले. त्यांच्या खेळाबद्दल त्याने वक्तव्य केले. इतकेच नाही, तर अनुश्रीने या पर्वाची विजेती व्हावी, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.