Sagar Karande Women’s Day special letter: आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान केला जात आहे. त्यांचा गौरव केला जात आहे. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचे कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकजण त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

आता अभिनेता सागर कारंडेनेदेखील त्याच्या आयुष्यातील महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून खास शब्दात त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“…तीच माझी पहिली बिग बॉस”

या व्हिडीओमध्ये सागरने लिहिलेले एक पत्र वाचले. तो म्हणाला, “प्रिय बिग बॉसच्या घरातील सगळ्या खऱ्या बॉसेस आणि माझ्या आयुष्यातील सगळ्या स्त्रिया… माझ्या आयुष्यातील पहिला बिग बॉस हा या घरात नाही, तो माझ्या घरी होता. लहानपणी माझी आई, तीच माझी पहिली बिग बॉस होती. ती मला रोज टास्क द्यायची. दूध संपव, अभ्यास कर.. त्या सगळ्या टास्कमध्ये मी कधी पास, कधी नापास व्हायचो. पण, तिने मला कधी घराबाहेर काढलं नाही, कारण प्रेमात एलिमेशन नसतं.”

पुढे तो म्हणाला, “मग मोठी बहीण आयुष्यात आली. ती दुसरी बिग बॉस. माझ्या प्रत्येक चुकांवर, सागर, मी आधीच सांगितलं होतं असं म्हणणारी. त्यानंतर माझ्या आयुष्यात माझी पत्नी आली आणि खरी गेम तिथून सुरू झाली. बिग बॉससारखे कॅमेरे घरात नाहीत, पण आमच्या हिच्याकडे अशी नजर आहे की माणूस मनात काय विचार करतो ते देखील तिला कळतं. मग माझ्या आयुष्यात माझी मुलगी आली. त्या दिवशी मला कळलं की मी कोणाचा स्पर्धक राहिलो नाही, मी तिचा कायमचा कंटेस्टंट झालो.”

“तिच्या एका हसण्यात मला इम्युनिटी मिळते. तिच्या एका अश्रूत मी एलिमिनेट होतो आणि तिच्या पप्पा या एका शब्दात मला ट्रॉफीपेक्षा मोठं बक्षीस मिळून जातं. तुम्ही नसता तर आमचं आयुष्य फक्त गेम राहिलं असतं. तुम्ही आहात म्हणून आयुष्याला एक घर मिळतं. माझ्या आयुष्यातील सगळ्या बिग बॉसना महिला दिनाच्या शुभेच्छा”, असे म्हणत सागर कारंडेने त्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी घरातील इतर स्पर्धक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

हा व्हिडीओ शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “महिला दिनाच्या निमित्ताने सागरने त्याच्या आयुष्यातील बिग बॉससाठी लिहिलं एक स्पेशल पत्र”, अशी कॅप्शन दिले आहे.

सागरने वाचलेल्या या पत्रावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “खूप दिवसांनी तुम्हाला पत्र वाचताना पाहिलं”, “सागर, तुम्ही खूप हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या”, “खूप छान दादा”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, रुचिता जामदार नुकतीच घरातून बाहेर पडली आहे, त्यामुळे आता बिग बॉसमध्ये आणखी काय ट्विस्ट असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.