Sagar Karande on Anushri Mane: ‘बिग बॉस’चे सहावे पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नुकतीच रेवा कौरसे बिग बॉसच्या सहाव्या पर्वातून बाहेर पडली. त्यानंतर तन्वी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रेवा घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉसच्या घरात पाच स्पर्धक उरले आहेत.

आता अनुश्री माने, राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन, दीपाली सय्यद असे पाच स्पर्धक घरात उरले आहेत. पहिल्या दिवसापासून हे स्पर्धक घरात होते. ते जिद्दीने खेळत राहिले. त्यांच्यात अनेकदा भांडणे झाली, नात्यांमध्ये दुरावा आला, अनेकदा वाद विकोपाला गेले, काही वेळा बिग बॉसने त्यांना शिक्षाही सुनावली. स्पर्धकांच्या चुकांवर चाहते, कलाकार अन् प्रेक्षक बोलत राहिले.

भाऊच्या धक्क्यावर चुकणाऱ्या स्पर्धकांना ओरडा खावा लागला, त्यांची वेळोवेळी कानउघाडणीही करण्यात आली. तसेच, बरोबर वा योग्य असणाऱ्या स्पर्धकांचे रितेश देशमुखने कौतुकही केले. अनेकदा टाक्सदरम्यान स्पर्धकांमध्ये भांडणे पाहायला मिळाली. काही वेळा त्यांच्यातील बॉण्डिंग अधिक घट्ट होताना दिसले; तर काही वेळा दुरावा निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले.

अभिनेता सागर कारंडेदेखील बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सहभागी झाला होता. काही दिवसांपूर्वी तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर त्याने विविध मुलाखतींमध्ये बिग बॉसमधील त्याचा प्रवास, तसेच इतर स्पर्धक, त्यांचा खेळ यांबद्दल वक्तव्य केले. काही मुलाखतींमध्ये त्याने अनुश्री विजेती व्हावी, अशीही इच्छा व्यक्त केली.

“तुझी जिद्द, मेहनत आणि महाराष्ट्राचं प्रेम…”

आता सागर कारंडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सागर कारंडे आणि अनुश्री माने डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. डान्स करताना ते मजा करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत त्याने लिहिले, “अनुश्री, तुला बिग बॉस मराठी ६च्या घरात ‘टॉप ५ फायनलिस्ट’मध्ये पाहताना खूप छान वाटत आहे. अभिमानाने ऊर भरून आला आहे.”

पुढे त्याने लिहिले, “प्रत्येक टप्प्यावर तू स्वतःला सिद्ध केलंस. तुझी जिद्द, मेहनत आणि महाराष्ट्राचं प्रेम तुला इथपर्यंत घेऊन आलंय. अशीच पुढे जात राहा… अजून मोठं यश तुझी वाट पाहतंय, अंतिम सोहळ्यासाठी तुला खूप शुभेच्छा”, असे लिहीत सागर कारंडेने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, आता या पाच स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार, हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.