‘ठरलं तर मग’ मालिका गेली साडेतीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना प्रामुख्याने कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळतो. सायलीचा नवरा अर्जुन सुभेदार हा वकील असतो आणि त्याचप्रमाणे सायली म्हणजेच तन्वीचे वडील रविराज किल्लेदार सुद्धा वकील आहेत. एकंदर कोर्टातील बरेच सीक्वेन्स या मालिकेत पाहायला मिळतात. अर्जुन आणि रविराज साकारत असलेल्या वकिलांच्या भूमिकांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. पण, तुम्हाला माहितीये का? ‘ठरलं तर मग’मध्ये वकिलाची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते सागर तळाशीकर खऱ्या आयुष्यात सुद्धा पेशाने वकील आहेत.

अभिनेते सादर तळाशीकर यांनी नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले, “मी आतापर्यंत चार ते पाच मालिकांमध्ये वकिलाची भूमिका साकारली आहे. ‘अवंतिका’, ‘सोनियाचा उंबरा’ यामध्येही मी वकिलाची भूमिका साकारली होती आणि आता ‘ठरलं तर मग!’ खरं कोर्ट आणि सिनेमातील कोर्ट यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे मी अनेकदा आमचे जे दिग्दर्शक आहेत सचिन गोखले त्यांनाही काही गोष्टी सांगत असतो. पण, खरं कोर्ट आणि मालिका-सिनेमा यामधील कोर्ट हे पूर्णपणे वेगळं आहे. खऱ्या कोर्टात एवढा ड्रामा वगैरे क्रिएट होत नाही पण, मालिकांमधून तो ड्रामा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी क्रिएट करावा लागतो.”

सागर तळाशीकर Law चं शिक्षण, वकील होण्याच्या प्रवासाविषयी सांगतात, “मी दहावी-बारावी, BCom पर्यंत सामान्य मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी होतो. मला तेव्हा नाटकाची आवड वगैरे काहीच नव्हती. मला खूप कमी मार्क्स मिळाले होते. MBA, सायन्स कुठेच ॲडमिशन मिळत नव्हतं. ना मी डॉक्टर होऊ शकत होतो…ना आर्किटेक्ट वगैरे! पण, त्यावेळी Law करणाऱ्यांना सहज ॲडमिशन मिळायचं. अगदी ३५ टक्के असतील तरीही तुम्हाला Law मध्ये प्रवेश मिळायचा. मग मी वकील होण्याचा निर्णय घेतला. कॉलेजच्या जीवनात मी अनेक स्पर्धांमध्ये वगैरे सहभाग घेतला. मग तिथे माझ्या मनात नाटकाविषयी आवड निर्माण झाली. माझं कॉलेज तेव्हा १० वाजता संपायचं आणि मला उरलेला संपूर्ण दिवस नाटकासाठी मिळायचा.”

“मग परिक्षेला जेव्हा महिना-दीड महिना बाकी राहायचा, तेव्हा मी नाटकाची स्क्रिप्ट वाचल्यासारखं ते पुस्तक वाचायचो आणि माझ्या सगळं लक्षात राहायचं. मी तेव्हा दोन्ही वर्षी विद्यापीठात पहिला आलो होतो. खरंतर, ते मी मनापासून केलंच नाही. पण, मी ड्राफ्टिंग वगैरे छान करायचो, दावे लिहायचो. या सगळ्यात मनापासून मुंबईला यायचं होतं…कारण, नाटकाची आवड निर्माण झाली होती. एकंदर ही भूमिका साकारताना मला माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा खूप फायदा झाला.” असं सागर तळाशीकर यांनी सांगितलं.