मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर नेहमीच चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातून सई घराघऱांत पोहचली. गेल्यावर्षी १७ डिसेंबरला सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सईने ही आनंदाची बातमी दिली होती. अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव ‘ताशी’ असे ठेवले आहे.

सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. काही दिवसांपूर्वीच सईने अभिनेत्री मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतची भेट घेतली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या तिघींमध्ये चांगली घनिष्ठ मैत्री झाली होती. सईने या भेटीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केले होते. मात्र, आता सईच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा- प्रेमाची गोष्ट : कोळी कुटुंबात संशयाचे वादळ; रागाच्या भरात इंद्रा मुक्ताला काढणार घराबाहेर, सागर काय करणार?

आई झाल्यानंतर सईच्या वजनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या शारीरिक बदलावरून अनेकांनी तिला ट्रोलही केले होते. एवढेच नाही तर मेधा व शर्मिष्ठा बरोबर शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी सईला वजनावरून टोमणे मारले होते. आता सईने पोस्ट शेअर करत वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले, “ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे, त्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही. त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या. सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे, जिथे तुमच्या शरीराचे सहा थर कापले जातात. या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात. तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, काहीही जड उचलू शकत नाही, वाकू शकत नाही, तुमच्या स्तनपानामुळे तुम्ही आहारही घेऊ शकत नाही.”

सईने पुढे लिहिले, “एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि या काळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे. या प्रतिक्रियांनी मला आश्चर्य वाटले, पण देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, कारण मला तुमची खूप दया येते. जर लोक थोडे आणखी समजूतदार, आदराने, दयाळू राहिले तर हे जग त्यांना राहण्यासाठी एक चांगले ठिकाण असेल.” सईची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.