साईराज केंद्रे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय बालकलाकारांपैकी एक आहे. त्याचा निरागस अभिनय, त्याचा बिंदास्त स्वभाव यामुळे तो अनेकांची मनं जिंकत आहे. सध्या साईराज ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत काम करत आहे. यामध्ये तो अभिनेता साईंकित कामत व प्राप्ती रेडकर यांच्या मुलाची भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्याच्या कामाचं अनेक जण कौतुक करत असतात.
साईराजचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. अनेकदा तो त्याच्या कुटुंबीयांबरोबर कॉमेडी रिल किंवा लोकप्रिय गाण्यांवर डान्स रिल करताना दिसतो. त्याच्या या रिल्सवर प्रेक्षक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. अशातच आता त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून यामध्ये मालिकेच्या सेटवर तो रात्रीच्या १ वाजता झोप आली असतानाही शूटिंग करत असल्याचं दिसतं.
साईराजने शेअर केला सेटवरचा व्हिडीओ
साईराज या व्हिडीओमधून म्हणाला, “मंडळी रात्रीचे एक वाजले आहेत आणि आमचं शूटिंग सुरू आहे. झोप आलीये मला आणि आता खोटा खोटा पाऊस पडणार आहे. तुम्ही प्लीज बघा. शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडीओ बघा.” पुढे साईराज मालिकेच्या सेटवर त्याच्या ऑनस्क्रीन बहिणीबरोबर सीन करताना दिसत आहे. यावेळी त्यांच्यामागे प्राप्ती रेडकर आणि साईंकित कामतही असल्याचं दिसतं. टँकरच्या पाण्याच्या मदतीने हा पाऊसातील सीन शूट झाल्याचं यामधून दिसतं. व्हिडीओमधून साईराजला सीन शूट करताना पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे.
साईराज क्रेंदे या मालिकेत अबीर हे पात्र साकारत असून काही महिन्यांपूर्वी या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे. साईराजने यापूर्वी याच वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत काम केलं. या मालिकेमुळेच तो खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला. अभिनयासह त्याला नृत्याचीही प्रचंड आवड असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमधून कळतं.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सावली आणि सारंग यांच्या आयुष्यात अनेक नवीन ट्वीस्ट येत असतात. सावली आणि सारंग एकमेकांपासून दुरावले होते परंतु, आता त्यांची मुलं अबीर आणि ओवी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काळात मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळेल.
