Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १५ जूनपासून ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ कृष्णाईची मुख्य भूमिका साकारणार आहेत. तीन मुलींच्या जन्मानंतर कृष्णाईच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. समाजाने तिला सतत कमी लेखलं पण, या परिस्थितीतही कृष्णाई कधीच खचली नाही. तिची स्वत:ची खानावळ असते. तिन्ही मुलींना योग्य संस्कार आणि शिक्षण देऊन तिने मोठं केलं.
कृष्णाईला शारदा, गौरी आणि सौदामिनी अशा तीन मुली आहेत. या मालिकेचा हिरो आहे लोकप्रिय अभिनेता रोहित परशुराम. यामध्ये तो शंकर ही भूमिका साकारणार आहे. शंकरच्या छातीवर ‘मातोश्री’ असं नाव लिहिलेला टॅटू असतो. त्याला या जगात सर्वात महत्त्वाच्या असतात त्याच्या मातोश्री. आता शंकरच्या मातोश्रींची भूमिका कोण साकारणार हे अखेर समोर आलेलं आहे.
शंकरच्या मातोश्री सत्यभामाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री स्मिता सरवदे साकारणार आहे. त्या म्हणतात, “नमस्कार मी सत्यभामा…शंकरच्या मातोश्री आणि या गावच्या सरकार! आता सरकार म्हटल्यावर तुम्हाला वाटलं असेल आम्ही शेतकऱ्यांचा छळ करतोय, पण असं अजिबात नाहीये. कृष्णा नदीचे संस्कार आहेत आमच्यावर…आणि या बळीराजाच्या पाठिशी आम्ही कायमच खंबीरपणे उभ्या असतो.”
स्मिता सरवदे यांच्या जोडीला या नव्या मालिकेत आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे. तिच्याही एन्ट्रीचा दमदार प्रोमो नुकताच समोर आला आहे. तिचं नाव आहे इंदुरानी. “जिला व्हायचंय एक नंबरची पट्टराणी, नाव तिचं ठेवा ध्यानात – इंदुरानी” ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधी साकारणार आहे.
साक्षी गांधी व स्मिता सरवदे यांच्या एन्ट्रीवर मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. साक्षी गांधीने यापूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तर, स्मिता सरवदे यांचा छोट्या पडद्यावरचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर त्यांनी असंख्य मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील सरू मावशीच्या भूमिकेचाही समावेश आहे.
सत्यभामा व इंदुरानी या दोघींच्या डॅशिंग आणि रुबाबदार लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासह ट्विंकल यादव ( गौरी ), रोहित परशुराम ( शंकर ), स्मिता सरवदे ( मातोश्री ), संजय कुलकर्णी, साक्षी गांधी ( इंदुरानी ), एकता लब्दे ( शारदा ) हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
