Saleel Kulkarni shares emotional post: सलील कुलकर्णी यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांनी लिहिलेल्या आणि गायलेल्या गाण्यांना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. सलील कुलकर्णी हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

सलील कुलकर्णी अनेक व्हिडीओ, फोटो, पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी त्यांचे मित्र संदीप खरे यांच्या लेकीच्या रूमानीच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडीओमध्ये रूमानीचा लग्नसोहळ्याची झलक पाहायला मिळत आहेत. अक्षतेच्या वेळी सलील कुलकर्णी यांनी स्वत: काही ओळी गायल्या आहेत. शांता शेळके यांनी लिहिलेल्या ओळी त्यांनी गायल्या असल्याचे ऐकायला मिळत आहे. तर रूमानी भावुक झाल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.

“तिचा काका म्हणून ही १०० सेकंदं कायम स्मरणात…”

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले, “चि.सौ.कां. रूमानी आणि चि. स्तवन यांना खूप खूप आशीर्वाद”, असे लिहित त्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या. पुढे त्यांनी लिहिले, “अनेक मैफिलीत, अनेक देशांत गाणी गाण्याचं भाग्य लाभलं. पण, रूमाच्या लग्नात मंगलाष्टकं गाताना गाण्यातून आशीर्वाद देता आला.”

संदीप खरेंना टॅग करत सलील कुलकर्णी यांनी लिहिले, “तिच्या बाबाचा मित्र आणि तिचा काका म्हणून ही १०० सेकंदं कायम स्मरणात राहतील. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कवीच्या घरच्या सोहळ्यात गायलेले हे शब्द शांताबाई शेळकेंचे आहेत. हा एक गोड योग आहे. एक गायक-संगीतकार काका हेच आणि खरं तर एवढंच पुतणीला देऊ शकतो. स्तवन आणि रूमा, कायम हसत राहा”, असे म्हणत सलील कुलकर्णी यांनी रूमानी व स्तवन शिंदेला आशीर्वाद दिले आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

“एका लेकीच्या बापाला अजून काय हवं?”

सलील कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. संदीप खरेंनी लिहिले, “मित्राचा कंठ आणि शांताबाई शेळके यांसारख्या प्रेमळ आजीचे शब्द.. एका लेकीच्या बापाला अजून काय हवं? या अष्टकानं सोहळा शब्दश: सुरेल मंगल झाला”, असे लिहित भावना व्यक्त केल्या.

रूमानीनं लिहिले, “संपूर्ण समारंभातील तो सर्वांत अविश्वसनीय क्षण होता. आम्ही तो कधीच विसरू शकत नाही. काका त्यासाठी मी तुमची कायम ऋणी असेन.” स्तवन शिंदेने लिहिले, “काका, हा क्षण अविस्मरणीय बनवल्याबद्दल खूप आभार. आमच्या लग्नातील मंगल अष्टका यापेक्षा चांगल्या असू शकल्या नसत्या. दैवी आवाज, सुंदर शब्द आणि मनातील भावना म्हणजे या मंगल अष्टका होत्या.”

अनेक नेटकऱ्यांनीदेखील सलील कुलकर्णी यांचे कौतुक केले आहे. “शहारे आणि अश्रू…कमाल”, “कितीदा ऐकते आहे”, “वाह! किती सुंदर! किती प्रसन्न वाटलं ऐकताना! अनमोल क्षण”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.

दरम्यान, रूमानी व स्तवन शिंदेच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते.