Bigg Boss 20 Salman Khan Chest pain Promo: सलमान खानच्या ‘बिग बॉस २०’ व्या सीझनचा या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ जोरदार चर्चेत आला आहे. त्यामध्ये भाईजानने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत शरीरावरून टीका करण्यांना खडेबोल सुनावले आहेत. आता बिग बॉसचा नवा प्रोमो आला असून, ज्यामध्ये अचानक सलमानच्या छातीत दुखत असल्याचे दाखवल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर आता स्वतः सलमान खानने स्वतः प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.
‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये सलमान खान सूत्रसंचालन करीत असताना अचानक त्याच्या छातीमध्ये दुखू लागते. त्यानंतर तो जॅकेट काढतो आणि जोरजोरात श्वास घेऊ लागतो. यावेळी स्पर्धकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसत असल्याचे दाखवण्यात आले. यावेळी भाईजानच्या छातीत दुखत असल्याने तो स्टेजच्या एका कोपऱ्यात बसल्यानंतर सलमान पूर्णपणे स्टेजवर आडवा झोपल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले. त्यावरून सोशल मीडियावर काळजी व्यक्त केली जाऊ लागल्याने त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत या प्रसंगामागचे खरे कारण सांगितले आहे.
‘बिग बॉस’च्या प्रोमोबद्दल सलमान खानने दिले स्पष्टीकरण
सलमान खानच्या छातीत दुखू लागलेल्या प्रोमोबद्दल त्याने स्टोरीमध्ये लिहिले, “देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरा असून, मला कोणताही त्रास झालेला नाही. बिग बॉसचा प्रोमो ज्या प्रकारे कट करून बनवण्यात आला, तसा तो करायला नको होता. कारण- त्यामुळे पूर्ण गोष्टीचा अर्थच बदलला आणि असं वाटतंय की, मी घरात काझीनं जे केलं, अगदी तसंच करीत आहे. मात्र, हा त्रास होत असल्याचे जे मी दाखवले, ते काझीला त्याची चूक दाखवून देण्यासाठी होते.”
पुढे सलमान खानने लिहिले, “काझीला हे करून दाखवले. कारण- त्याने स्वतःच्याच आरोग्याचा वापर मनोरंजनासाठी केला. विशेषतः, घरातील इतर १५ सदस्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती की, तो अभिनय करतोय आणि त्याला खरे तर काहीच झाले नव्हते. घरातील सदस्यांनी त्याच्या आरोग्याबाबत खूप काळजी व्यक्त केली. पण, ज्या पद्धतीने हा प्रोमो दाखवण्यात आला, त्यासाठी मी माफी मागतो.”

पुढे सलमान खानने अशा रीतीने सीन कट करून प्रोमोमध्ये दाखवणे हे बिग बॉसने प्रमोशनसाठी केले असल्याचे सांगितले. त्याने पुढे लिहिले, “ज्या प्रकारे सीन कट करून प्रोमोमध्ये दाखवण्यात आलाय, ते पाहता, कदाचित शोच्या प्रमोशनसाठी अशा पद्धतीचा वापर केला जात असावा. या प्रकारामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर त्यांच्या वतीने मी माफी मागतो.”
सलमान खानने या बिग बॉसच्या प्रोमोमुळे गैरसमज निर्माण झाल्याचे सांगितल्यानंतर बिग बॉसच्या टीमकडून यामध्ये बदल करण्यात आला. त्याबाबत पुन्हा एकदा स्टोरी पोस्ट करीत सलमानने लिहिले, “बिग बॉसने यामध्ये सुधारणा केली आहे, त्यासाठी बिग बॉसचे आभार…”
