Salman Khan Deepfake AI Warning Big Boss Statement: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने अभिनेत्रींचे वजनावरून ट्रोलिंग आणि चुकीच्या कॅमेरा अँगलने घेतलेले शॉट्स यावर नाराजी व्यक्त केली होती. कठोर शब्दांमध्ये सलमानने पापाराझींवर संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमानने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून खोट्या व्हिडीओ बनवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

बिग बॉसमध्ये सलमान खानने फेक कंटेंटबाबत काळजी व्यक्त केली. तसेच असे व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. सलमान म्हणाला, “आजकाल अनेक जण एआयचा (AI) गैरवापर करून लोकांचे आवाज आणि चेहरे वापरून बनावट पद्धतीचे व्हिडीओ तयार करत आहेत. या गोष्टींचा चांगल्या लोकांवर वाईट परिणाम होतोय. AIचा असा चुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकले पाहिजे.”

AI हा खूपच गंभीर विषय – सलमान खान

पुढे सलमान खान म्हणाला, आपण जे बोलतो, त्याची जबाबदारी ही आपली स्वतःची असली पाहिजे. त्या वक्तव्याचे जे परिणाम होतील, त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. पण, सध्या एआयचा वापर करून व्हिडीओ आणि डबिंग केलं जात आहे. बनावट व्हिडीओ बनवले जात आहेत. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे असे प्रकार सुरू आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहे. AI तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढे पुढे गेले आहे की हे एक धोकादायक बनले आहे. हा खूपच गंभीर विषय झाला आहे, कारण आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत.

पुढे तो म्हणाला, “कोणीतरी तुमचा एआय आवाज घेऊन त्यावर डबिंग करतात आणि दुसऱ्याचा अपमान करतात. AI व्हिडीओ करून समोरच्याला शिवीगाळ करतात. खूप लोकांचे असे व्हिडीओ केले जात आहेत. अगदी माझे स्वतःचेसुद्धा बनावट (एआय) व्हिडीओ केले आहेत. ते अगदी खरे असल्याप्रमाणे दिसतात.”

सलमान खान म्हणाला, “ज्या लोकांना याबद्दल माहीत नाही, त्यांच्या हे लक्षात येत नाही. ते असे व्हिडीओ पोस्ट करतात आणि सलमान खान तिथे होता असे सांगतात. पण, ज्या लोकांना याबद्दल माहीत आहे आणि जे लोक हे मुद्दाम करत आहेत, ती कशाप्रकारची माणसे आहेत? जे लोक बनावट AI व्हिडीओ बनवत आहेत, त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे.”