Salman Khan: सलमान खान हा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याची मुलाखतीतील वक्तव्ये चर्चेत असतात, तर काही वेळा त्याचे नवीन तसेच जुने व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही वेळा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट लक्ष वेधून घेतात.

सलमान खान त्याच्या चाहत्यांबरोबर नेहमीच प्रेमाने वागतो. त्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. आता एका चाहतीने सलमान खानबरोबरची एक आठवण सांगितली आहे. रीना राजू असे या चाहतीचे नाव आहे. त्यांचे तीन वेळा हृदय प्रत्यारोपण झाले आहे.

“माझ्या शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री…”

व्हॉईस ऑफ बेंगलुरू या प्लॅटफॉर्मवर बोलताना रीना राजू यांनी सलमान खानबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “सलमान सरांबद्दल बोलताना मी भावुक होईन. पहिल्यांदा माझे हृदय प्रत्यारोपण केले, तेव्हा माझ्याकडे त्यांचा नंबर होता. मी त्यांना मेसेज केला होता. इतके लोक त्यांना मेसेज करत असतील, पण त्यांनी माझ्या मेसेजला उत्तर दिलं. मी त्यांना सांगितलं की माझं हृदय प्रत्यारोपण होणार आहे. त्यांनी माझ्या शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री फोन केला आणि जवळपास दोन तास ते माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर बोलले. ते माझ्या कुटुंबाशी खूप प्रेमळपणे वागले आणि मला धीर दिला. त्यावेळी ते ऑस्ट्रेलियात शूटिंग करत होते.”

Award Banner

रीना यांनी पुढे खुलासा केला की, त्यानंतर दोन वर्षे सलमान खानबरोबर कोणताही संपर्क नव्हता. मात्र, त्यांच्या फाउंडेशनबाबत पुन्हा त्याच्याशी संपर्क केला, तेव्हा सलमानने तिला लगेच ओळखले.

पुढे रीना म्हणाल्या, “आम्ही त्यांच्या घरी संपूर्ण रात्र पार्टी करत, गाणी गात आणि डान्स करत घालवली. माझ्या दुसऱ्या हृदय प्रत्यारोपणानंतर चार महिन्यांनी मला डायबिटीज आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या होत्या, पण तरीही मी खूप आनंदात होते.”

सलमानने रीना यांच्यासाठी आणखी काय केले होते याबद्दल त्या म्हणाल्या, “ते आम्हाला ‘रेस ३’च्या सेटवर घेऊन गेले होते आणि आम्ही तिथे संपूर्ण दिवस घालवला. त्यांनी मला बिईंग ह्युमनची (Being Human) ची पांढरी सायकल भेट म्हणून दिली होती. मी त्यांना खूप आधी त्याबद्दल मेसेज केला होता, हे त्यांना आठवत होते”, असे म्हणत रीना यांनी सलमान खानने रीना यांच्या कठीण काळात दयाळूपणा दाखवला होता, याची आठवण त्यांनी सांगितली.

दरम्यान, सलमान खान लवकरच ‘मातृभूमी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.