Sameer Khandekar New Home: ‘लव्ह लोचा लग्न’, ‘काहे दिया परदेस’, ‘ती परत आलीये’, ‘कॅरी ऑन मराठा’ अशा अनेक मालिकांमधून समीर खांडेकरने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्या विनोदी भूमिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. काही दिवसांपासून समीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

समीर खांडेकर व त्याच्या पत्नीने पिठी भात हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. हे रेस्टॉरंट दादरमध्ये आहे. आता अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने एक मोठा खुलासा केला.

“आम्ही दोघंही एकसारखाच…”

अभिनेता म्हणाला, “मी मूळचा लालबाग, गिरणगावचा आहे. माझ्यातून लालबाग जाऊ शकत नाही. कारण- संपूर्ण गिरणगाव मी बघत आलो आहे. तर, आम्ही लग्नानंतर म्हणजेच २०१५-२०२५ अशी १० वर्षे बोरिवलीमध्ये राहत होतो. देवाच्या कृपेनं बोरिवलीमध्ये स्वत:चं मोठं घर होतं. पण, वांद्र्याच्या पुढे आलो की, माझ्या डोळ्यांत पाणी यायचं. मी माझ्या पत्नीला याबद्दल बोलत असे. गिरणगाव किंवा दादरच्या पुढचा भाग माझ्या डोक्यातून जात नव्हता. कारण- माझे मित्र, माझी विचार करण्याची पद्धत, माझी आवड, माझे सवंगडी सगळे या भागातले आहेत. त्यामुळे काहीतरी कमी आहे, असं बोरिवलीला राहताना वाटत असे.”

पुढे तो म्हणाला, “माझ्या मुलीला शाळेत घालायचं होतं, तर त्यासाठी आम्ही शाळा बघत होतो. सुदैवानं आम्ही दोघंही एकसारखाच विचार करतो. आम्हाला आमच्या मुलीसाठी मराठीच शाळा पाहिजे होती. आम्ही खूप शाळा शोधल्या. बोरिवलीमध्ये शाळा नाहीत, हा काही मुद्दा नाही. पण, आम्हाला अजून छान शाळा हव्या होत्या. मग आम्ही गोरेगावमधील एक शाळा निवडली. अ. भि. गोरेगावकर या शाळेत राहीला प्रवेश घेतला. आम्ही ठरवलं की, बोरिवलीतलं घर विकायचं आणि गोरेगावमध्ये राहायला जायचं.”

अभिनेता असेही म्हणाला, “एके दिवशी व्यायाम करताना माझ्या डोक्यात विचार आला की, जर मी बोरिवलीमधून गोरेगावात शिफ्ट होणार असेन, तर मग दादरला शिफ्ट होऊ. ते असं असतं ना की, घर बोलावतंय, असं वाटलं की, परत जाऊ. त्याच दिवशी ठरवलं की, मुलीला बालमोहन विद्यालयात प्रवेश घेऊ. मी माझ्या मित्राला एक फोन केला आणि त्याला विचारलं की, बालमोहनचं अॅडमिशन सुरू आहे का, त्यावर तो म्हणाला की, जवळजवळ झालं आहे. तरी मी तिथल्या एका सरांना भेटलो. ते म्हणाले की, तुमच्या पाल्याला घेऊन या. त्यानंतर आम्ही फॉर्म भरला. राहीचा प्रवेश बालमोहन विद्यालयात घेतला. तेथील सर बोलता बोलता म्हणाले की, मी तुम्हाला एक सल्ला देऊ का? शक्यतो तुमचं जे पाल्य असेल, ते सायकलनं शाळेपर्यंत येईल असं बघा. आम्ही तिथे भाड्यानं घर घेऊन राहिलो. आमचं रेस्टॉरंटचं प्लॅनिंग होतंच. बोरिवलीमध्ये असताना आम्हाला असं वाटत होतं की, वांद्र्यामध्ये रेस्टॉरंटचं प्लॅनिंग करू. पण, दादरमध्ये आल्यानंतर तिथेच रेस्टॉरंट सुरू करायचं हे आम्ही ठरवलं. मग आम्ही दादरमधील सगळ्या जागा पिंजून काढल्या. आम्ही विचार केला की, आधी रेस्टॉरंट सुरू करूया, घर होईल तेव्हा होईल. पण, आई-वडिलांच्या पुण्याईनं दादरमध्ये आम्ही घरही विकत घेतलं. हे मी पहिल्यांदा सांगतोय. माझ्या काही मित्रांना माहीत नसेल. त्याच्याबरोबर रेस्टॉरंटही झालं.

पुढे अभिनेता म्हणाला, “दादरमध्ये मुलींची शाळा झाली, स्वामींच्या, गणपती बाप्पांच्या कृपेने दादरमध्ये घर झालं, रेस्टॉरंट झालं. हे सगळं सहा महिन्यांत झालं.”