Sameer Khandekar Pithi Bhat Veg Malvani Restaurant : लोकप्रिय मराठी अभिनेता समीर खांडेकरने काही दिवसांपूर्वीच दादरमध्ये त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं. याचं नाव आहे ‘पिठी भात’! समीरच्या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्ध शाकाहारी मालवणी पदार्थ सर्व्ह केले जाणार आहेत. आता हे रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय समीरने का घेतला? हॉटेलचं नाव त्याने कसं ठरवलं? याबद्दल अभिनेत्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

समीर म्हणाला, “मालवणी म्हटलं की लोकांना फक्त नॉनव्हेज पदार्थच माहीत असतात. लोकांना असंही वाटतं की, मालवणी माणसं ही रोज उठून कोंबडी वडेच खातात. आता मुंबईत नॉनव्हेज मालवणी रेस्टॉरंट अनेक आहेत. पण, कुठेही शुद्ध शाकाहारी मालवणी रेस्टॉरंट नाहीये…मी असा दावा वगैरे करत नाही. पण, खरंच नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटलं की, मालवणी व्हेज पदार्थ सुद्धा किती सुंदर असतात. मग आपण लोकांना फक्त मालवणी व्हेज पदार्थ सर्व्ह केले तर किती भारी होईल? मग भराभर सगळ्या मालवणी पदार्थांची नावं डोळ्यासमोर आली आणि मग यातून जन्माला आलं पिठी भात!”

समीर कुडाळचा आहे तर, त्याची पत्नी वैभवी देवगडची आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून ‘पिठी भात’ रेस्टॉरंटचा मेन्यू डिझाइन केला आहे. समीर याबद्दल म्हणाला, “आम्ही मध्यंतरी जपानला गेलो होतो आणि अलीकडेच दुबईत सुद्धा मी पाहिलं…. तिथे ‘वन बाउल मिल सर्व्ह’ केले जातात. म्हणजेच तुम्हाला राइस दिला जातो…त्याबरोबर मग तुम्ही इतर ग्रेव्ही सिलेक्ट करून घेऊ शकता की, चिकन ग्रेव्ही पाहिजे की आणखी काही…त्यानुसार मग मी हा मेन्यू ठरवला. पिठी भात, कुरडई, लोणचं यात तुम्ही आवडीनुसार वांग्यांची-बटाट्याची किंवा सुरणाची कापं घेऊ शकता. याशिवाय भाताबरोबर वाटणाची डाळ, सार असेही ऑप्शन आहेत.”

समीर खांडेकरच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टसाठी कट वडा, चहा घावणे, पोहे असे पदार्थ आहेत. तर, गोड पदार्थांमध्ये प्रसादाचा शिरा, रस शिरवाळे, मालपुआ याचा समावेश आहे. लिंबू सरबत, कोकम सरबत, सोलकढीही मेन्यूमध्ये आहे. याशिवाय पिठी भात, काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे, वांगी-सुरण-बटाट्ट्याची कापं, सार भात, वाटणाची डाळ आणि भात या पदार्थांचा आस्वाद खवय्ये घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे समीरच्या हॉटेलमध्ये बरेच सीझनल पदार्थही त्या-त्या सीझननुसार उपलब्ध असतील. उदा. फणसाची भाजी, गणपतीत ऋषीची भाजी.

दरम्यान, समीर खांडेकर ‘काहे दिया परदेस’, ‘ती परत आलीये’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली वर्षानुवर्षे तो रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्येही समीर सहभागी झाला होता.