Sameer Paranjape on his new role: सुंदरा मनामध्ये भरली, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून अभिनेता समीर परांजपे लोकप्रिय ठरला. या दोन्ही मालिकांतील त्याच्या भूमिका खूप मोठ्या प्रमाणात गाजल्या. आता नुकताच तो कलर्स मराठी वाहिनीवरील मोहिनी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या मालिकेत त्याने आरके ही भूमिका साकारली आहे. मालिकेत तो अभिनेता म्हणून काम करतो. त्याचा लूकही नेहमीपेक्षा वेगळा दिसत आहे. समीरला त्याच्या इतर भूमिकांप्रमाणेच या भूमिकेलादेखील लोकप्रियता मिळत आहे.
आता अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याची नवीन भूमिका आणि त्याचा लूक यांबद्दल पत्नी, मुलगी आणि आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितले आहे.
“…त्यामुळे तिला पहिला एपिसोड दाखवलाच नाही”
समीरने नुकतीच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला विचारले गेले की, या मालिकेतील तुझी भूमिका, लूक आणि पहिला एपिसोड पाहिल्यानंतर पत्नी व मुलीची काय प्रतिक्रिया होती? त्यावर समीर म्हणाला, “माझी मुलगी आता सहा वर्षांची झाली आहे. त्यामुळे तिला पहिला एपिसोड दाखवलाच नाही. कारण- ती जे प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. ती बाकी कोणाला प्रश्न विचारणार नाही, मलाच विचारणार आणि त्यामुळे तिला तो एपिसोड दाखवलाच नाही.”
“मालिकेत जे तू दुसऱ्याशी तुसडेपणा…”
पुढे तो पत्नीची प्रतिक्रिया काय होती, हे सांगताना म्हणाला, “बायकोला हा लूक आवडला आहे. भूमिका पाहिल्यानंतर तिचं म्हणणं असं आहे की, खूप सहज करतोस. लोकांना वाटतं की, तू सरळ, साधा आहेस; पण मालिकेत जे तू दुसऱ्याशी तुसडेपणा वगैरे वागतोस, ते तू अगदी योग्य करत आहेस. ते मला काही नवीन नाही”, असे म्हणत खऱ्या आयुष्यात तो जसा वागतो, तशीच ती भूमिका असल्याचे पत्नीचे मत असल्याचे समीरने सांगितले.
आई-वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल तो म्हणाला, “माझे जे काही आतापर्यंत प्रोजेक्ट्स होते, त्यामध्ये मला ज्या भूमिका मिळाल्या. त्यामध्ये मला नोकरीच नव्हती. तर माझ्या आईचं हे वेगळंच दु:ख होतं. मी माझ्या खऱ्या आयुष्यात इंजिनियरिंग केलं; पण जॉब केला नाही. थेट अभिनय क्षेत्रात आलो. त्यामुळे तिला वाटत असायचं की, तुला काम का नसतं? काहीही काम न करणारा, असाच का असतोस दर वेळी? त्यामुळे या मालिकेतील भूमिका पाहिल्यानंतर तिला आनंद झाला. तिला असं वाटलं की, याच्याकडे काम आहे. आता ती खूश आहे.”
दरम्यान, मालिकेतील भूमिकांबरोबरच अभिनेता त्याच्या गाण्यांमुळेदेखील लोकप्रिय आहे.
